महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र पथक आणि इतर उपाययोजनामुळे रायगड जिल्ह्य़ातील महिलावरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्य़ात विनयभंगाचे १०१ तर बलात्काराची ४६ प्रकरणे समोर आली आहेत.

रायगड पोलीस दलाच्या हद्दीत सन २०१४ मध्ये महिला अत्याचाराची १४९ प्रकरणे समोर आली होती. यात विनयभंगाच्या १०१ आणि बलात्काराच्या ४८ प्रकरणांचा समावेश होता. २०१५ मध्ये हे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसून आले. विनयभंगाचे ११३ तर बलात्काराचे ८८ असे एकूण २०१ गुन्हे दाखल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन रायगड पोलीस दलात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली. या पथकाला दामिनी पथक असे नाव देण्यात आले.

प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. बीट मार्शल्सच्या धर्तीवर या महिलांना स्वतंत्र दुचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. प्राथमिक उपचार साहित्य, मोबाइल, वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे या ठिकाणी गस्ती घालून महिलांची छेडछाड रोखण्याचे काम या दामिनी पथकांना सोपवण्यात आले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे वॉट्सअप ग्रुप बनवून कोणी त्रास दिल्यास तात्काळ पोलिसांची मदत मागण्याचे आवाहन करण्यात आले. या सर्व उपाययोजनांचे सकारात्मक पडसाद दिसण्यास सुरुवात झाली.

या वर्षी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. २०१६ मध्ये ११ महिन्यांत महिला अत्याचाराची १४७ प्रकरणे समोर आली. यात विनयभंगाच्या १०१ तर बलात्काराच्या ४६ प्रकरणांचा समावेश आहे. दाखल झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये गुन्हे शाबितीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणात आरोपींना जास्तीजास्त शिक्षा कशी होईल. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसतील, असा विश्वास पोलीस दलाने व्यक्त केला आहे.