• पाच दिवसांनंतरही पोलीस दादापूरपासून लांबच
  • नक्षल्यांनी जाळलेली वाहने, बॅनर कायम

जिल्हय़ातील अतिदुर्गम गावांमध्ये नक्षलवाद्यांची इतकी प्रचंड दहशत आहे की ३६ वाहनांची जाळपोळ झालेल्या दादापूर गावाला  घटनेला पाच दिवस झाल्यानंतरही पोलिसांनी भेट दिलेली नाही. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात लावलेले बॅनर, पोस्टर अजूनही कायम आहेत. विशेष म्हणजे पुराडा पोलिस ठाण्यापासून अवघ्या ३ कि.मी.अंतरावर दादापूर हे गाव आहे. जळालेली वाहनेही तशीच आहेत.

कुरखेडा या तालुक्याच्या ठिकाणाहून दादापूर हे गाव साधारणत: १५ कि.मी.अंतरावर असून एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात मागील तीन महिन्यापासून छत्तीसगड येथील अमर इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनीचे किमान ५०० कामगार वास्तव्याला होते. काहींनी या गावात घर भाडय़ाने  घेतले होते तर काही उघडय़ावरच वास्तव्याला होते. दिवसभर रस्त्याचे काम करायचे. दोन वेळ जेवण आणि रात्री झोपणे असा या कामगारांचा दिनक्रम होता. रस्त्याच्या कामामुळे गावातही हालचाल होती. उत्तर गडचिरोलीत नक्षली कारवाया थंडावल्याने या भागात एकप्रकारे शांतता होती.  ३० एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवादी अचानक या गावात धडकले आणि जाळपोळ, हिंसाचार घडवला.  गावातील प्रत्येक गल्ली, बोळात केंद्र व राज्य सरकाच्या विरोधात कापडी बॅनर व पोस्टर लावले. वातावण बदलण्यासाठी गावकरी पोलिसांच्या भेटीची प्रतिक्षा करत आहेत. परंतु पाच दिवस झाले तरी पोलीस गावात आलेले नाहीत. त्यामुळे गावातून फेरफटका मारला तरी दहशत व भिती काय असते याची कल्पना येते.

पोलिसांचे सावध पाऊल

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कुरखेडा हत्याकांडानंतर पोलीस सावध पावले टाकत आहेत.  दादापूर गावात जाण्याचे आदेश वरिष्ठांनी अद्याप दिलेले नाहीत. तसेच पोलिस सर्व बाजूंनी परिस्थितीची माहिती  घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच पोलिस गावात पोहोचतील. त्यासाठी आणखी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागला तरी चालेल. परंतु आता कुठलाही धोका पत्करायचा नाही अशी पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळेच घटनेच्या पाचव्या दिवशीही पोलिस दादापूर येथे पोहचलेले नाहीत.