|| हर्षद कशाळकर

अलिबाग : रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर पेण शहरालगत असलेल्या मळेघरवाडी येथे अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहेच. पण अशा घटना नेमक्या का घडतात हे शोध घेणेही गरजेचे आहे.

रोहा तालुक्यातील तांबडी येथील घटनेत सात जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्य़ाचे तीव्र पडसाद उमटले. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता जलदगती न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
हे प्रकरण ताजे असतानाच आता पेण तालुक्यातील मळेघर येथे अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला यापूर्वीही महिला अत्याचाराच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यातून तो जामिनावर सुटला होता.

गेल्या वर्षी खोपोली येथील शिळफाटा परिसरात चार वर्षीय बालिकेची हत्या करण्यात आली होती. तीच्या शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले होते. शरीरावर चटके दिल्याच्या जखमाही होत्या. त्यापूर्वी माणगाव तालुक्यातील वावे गावातील सात वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. दोन दिवसांनी गावातील एका बंद घरातून दरुगधी येण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा एका पोत्यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. क्राइम स्टोरीज पाहण्याची आवड असलेल्या एका विकृत तरुणाने या मुलीचे अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले. महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराचे प्रमाण हे प्रमाण समाजातील विकृत मनोवृत्ती बळावल्याचे द्योतक आहे. पोलीस कारवाई बरोबरच मुलांचे मानसिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.

बरेचदा कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी अनेकदा मुली समोर येऊन तक्रारी देत नाही. त्यामुळे अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांची मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते. आणि त्याचा परिणाम इतर मुलींना भोगावे लागतात. त्यामुळे मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात समोर येऊन तक्रार देणे गरजेचे आहे.

शाळा-महाविद्यालयांत प्रबोधन मोहीम

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयात जाऊन मुलामुलींचे प्रबोधन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दामिनी पथक, महिला हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रतिसाद नामक एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी, शाळा महाविद्यालय परिसरात, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

तरुणांमध्ये ही मानसिकता कुठून निर्माण होते, हे शोधण गरजेचे आहे. कायदेशीर कारवाईबरोबर यासंदर्भात सामाजिक प्रबोधन आवश्यक आहे. मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, पालकांनी यासाठी पुढाकार घेऊन तरुण मुलांचे प्रबोधन करायला हवे, मुली या उपभोगाची वस्तू नाही याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. दुसरीकडे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.    – सुरेखा दळवी, सामजिक कार्यकर्त्यां

पेण येथील प्रकरणातील आरोपीवर याच स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक वेळी कारागृहातून आल्यावर तो असे गुन्हे करत आहे. त्यामुळे कुठे तरी आपले कायदे मुली आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात कमी पडत आहेत. कायद्याचा धाक दाखवून असे प्रकार थांबत नसल्याचेही दिसून येत आहे, त्यामुळे कायदेशीर कारवाईसोबत कुठे तरी मुलामुलींचे सामाजिक प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी आता पुढाकार घ्यायला हवा.  – वैशाली पाटील, संघटक महिला अत्याचार विरोध मंच, पेण