मुख्याध्यापकाला मारहाण, संशयिताची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, दोघे अधीक्षक निलंबित

कुरळप आश्रमशाळेतील लंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस येताच गुरुवारी संतप्त महिलांनी मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली, तर प्रमुख संशयित अरिवद पवार याच्या कक्षातून पोलिसांनी आज अश्लील चित्रफिती व उत्तेजक औषधे जप्त केली. गावकऱ्यांनी गाव बंद ठेवत संशयिताची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दहन केले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोघा अधीक्षकांना निलंबित करीत आश्रमशाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने आज शासनाकडे पाठविला.

अत्याचारित मुलींच्या निनावी तक्रारीवरून पोलिसांनी कुरळप येथील वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मीनाई आश्रमशाळेमध्ये चौकशी केली असता लंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला. ५ मुलींनी आश्रमशाळेचा संस्थापक अरिवद आबाजी पवार याने बलात्कार केल्याची आणि ३ मुलींनी विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर पवार याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यामध्ये सहकार्य करणारी महिला शिपाई मनीषा कांबळे हिलाही अटक करण्यात आली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रकाराने संतप्त झालेल्या गावातील महिलांनी शाळेत जाऊन मुलींवरील अत्याचारास पवार याला मदत केल्याच्या संशयावरून मुख्याध्यापक सुनील साळुंखे याला बेदम मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला ताब्यात घेतले आहे. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज कुरळपमध्ये बंद पाळण्यात आला. संशयित पवार याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच पुतळ्याचे दहनही मुख्य  चौकामध्ये करण्यात आले. या घटनांमुळे पोलिसांनी शाळेभोवती बंदोबस्त वाढवला आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आश्रमशाळेत जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक सुहैल शर्माही होते. आश्रमशाळेत वास्तव्यासाठी ७० मुली असून या मुलींकडे चौकशी करून आणखी काही प्रकार घडले आहेत का, याचा तपास करण्याच्या सूचना या वेळी नांगरे-पाटील यांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन कोणतेही कच्चे दुवे तपासात राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना केली.

दरम्यान, आज पुन्हा पोलिसांच्या पथकाने आश्रमशाळेची दोन तास झडती घेतली असता पवार वास्तव्यास असलेल्या कक्षातून आक्षेपार्ह चित्रफिती आणि उत्तेजक औषधे मिळाली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी चित्रफिती आणि औषधे जप्त केली आहेत. पीडित मुलींची काल रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात या मुलींना दिले.

आश्रमशाळेचा संस्थापक अरिवद पवार हा शिराळा तालुक्यातील मांगले येथील रहिवासी आहे. युती शासनाच्या कालावधीमध्ये त्याने वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथे निवासी आश्रमशाळा सुरू केली. या शाळेमध्ये पहिली ते बारावीपर्यंत २५० विद्यार्थी दाखल असून यापकी ७० मुली आहेत. दरम्यान, लंगिक अत्याचाराची समाजकल्याण विभागाने दखल घेत मीनाई आश्रमशाळेतील सुभाष पाटील आणि माधुरी कमद या दोन अधीक्षकांना निलंबित केले असून आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे गुरुवारी पाठविला.