ट्रकसह सुमारे २० लाख ७७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना

राहाता:   कडा (जि. बीड) येथून कापूस घेऊन लोणी—संगमनेर रस्त्यावरून जात असताना ट्रक चालकावर चाकूने वार करत ट्रकसह सुमारे २० लाख ७७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची घाटात घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले होते. वैजापूर पोलिसानी तत्काळ नाकेबंदी केल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील चार भामटे व कापसाचा ट्रक पोलिसांच्या हाती लागला असून या आरोपींना वैजापूर पोलिसांनी आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी चारही आरोपींना संगमनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेले ट्रकचालक भरत भगवान उंडे (वय — २६, ता. पाटोदा जि. बीड) यांने दिलेल्या माहितीनुसार आश्वी पोलीस ठाण्यात चाकूचे वार करुन ट्रक लुटणाऱ्या अज्ञात चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी रात्री वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे रात्रीची गस्त घालीत असताना लाडगाव चौफुलीवरुन गंगापूरच्या दिशेने कापसाने भरलेला एक मालमोटार  भरधाव वेगाने जाताना त्यांना दिसला. संशय बळावल्याने पोलिसांनी गंगापूर चौफुलीवर नाकेबंदी करुन ही मालमोटार ताब्यात घेतली. यावेळी ट्रकचालक श्रीरंग औताडे (वय २७), संदीप गलाडे (वय १९, दोघे रा. सारलाबेट, ता. श्रीरामपूर) तसेच जुबेर सय्यद (वय  २६) व शुभम काळे (वय २४,  दोघे रा. माळेवाडी, वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) या चार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्यची कबुली दिली. यानंतर पुढील चौकशीसाठी आरोपीना आश्वी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान ट्रकचालक भरत उंडे याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळाली आहे. तर शुक्रवारी चारही आरोपींना संगमनेर न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आश्वी पोलिसांनी दिली आहे.