पारनेर : अवैध व्यावसायिक, गुन्हेगार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा ठपका ठेवत पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद बोरगे व शिपाई शिवाजी कावडे यांची अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी तडकाफडकी पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली.

भटक्या समाजातील, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून तालुक्यातील निघोज येथील सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याच्या तक्रारी शिवाजी कावडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या होत्या. तर कावडे यांच्यासह विनोद बोरगे यांच्या विरोधात घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई टाळण्यासाठी वाळू तस्करांकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे घेतल्याची तक्रार प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.

पोलीस नाईक बोरगे आणि शिपाई कावडे यांच्याविरोधात गैरव्यवहाराच्या इतरही तक्रारी वेळोवेळी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी बोरगे व कावडे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना दिले होते. गवळी यांनी केलेल्या चौकशीत बोरगे व कावडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले. तसा अहवाल सहायक पोलीस निरीक्षक गवळी यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवला. अहवाल प्राप्त होताच तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बोर्डे व कावडे या दुकलीची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली.निघोज दूरक्षेत्रात कार्यरत असताना कावडे यांनी निघोज येथील दारूबंदी उठवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा निघोज परिसरात होती.तशी तक्रार दारूबंदी कृती समितीने पोलीस महानिरीक्षकांकडे केली होती. कावडे यांच्या विरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी करूनही कावडे यांच्यावर कारवाई होत नसल्याने निघोज परिसरात आश्चर्य व्यक्त होत होते.

कारवाईवर समाधान

कावडे व बोरगे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत सर्वसामान्य नागरिकांना अनेकवेळा वेठीस धरले. मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार केला. अवैध व्यावसायिकांना त्यांच्याकडून नेहमीच पाठबळ मिळाले. त्यांच्यावर झालेली बदलीची कारवाई जुजबी स्वरूपाची असली तरी कावडे व बोरगे यांच्या चौकशीला सुरुवात झाली ही समाधानाची बाब आहे. या दोघांवरही गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद व लोकजागृती सामाजिक संस्थेने केली आहे.