डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा वाघाडी येथील कातकरी कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी  १३ हजार उसने पैसे घेतले असल्याचे कारण पुढे करून चिंचणी येथून बळजबरीने मजुरीसाठी भिवंडी येथे नेणाऱ्या वीटमालकाविरुद्ध वाणगाव पोलीसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन वर्षांपूर्वी कासा वाघाडी येथील रेखा सवरा या कातकरी कुटुंबाने भिवंडीमधील गाणे गावात वीटभट्टीवर काम करत असताना वीटभट्टी मालक दिनेश तरे याने रेखा सवरा हीच्या कुटुंबाला १३ हजार रुपये आगाऊ दिले होते. मात्र सध्या रेखा सवरा यांच्या कुटुंबासह दहा तर बारा कुटुंबे रोजगारासाठी चिंचणी येथे स्थलांतरित झाले आहे.

कासा वाघाडी येथील कातकरी समाजाचे दहा-बारा कुटुंबे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तंबू बांधून चिंचणी नागेश्वरी पाडय़ावर राहत असताना रविवारी  रात्री दहा वाजता तरे आणि  त्यांच्या साथीदारांनी घराचा (तंबूचा)  दरवाजा बळजबरीने उघडून, रेखा व तिचे दोन भाऊ  विजय वाघात आणि दिनेश वाघात  यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि त्यांना भिवंडी येथील नाणे गावात नेले.    ही माहिती श्रमजीवी संघटनेचे महिला कार्यकर्ती  संध्या रावते व नयना दुबळा यांना मिळाल्यावर त्यांनी ती  वानगाव येथील श्रमजीवी कामगार  संघटनेचे  जिल्हा उपाध्यक्ष रवि चौधरी, तालुका महिला सचिव सुनीता गडग याना सांगितली.  घटनास्थळी  माहिती घेतली आणि रविवारी  चिंचणी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाला नेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दखल घेत या मजुरांची सुटका केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बेवारस बालिकेचा मृत्यू; अज्ञात माता-पिता विरोधात गुन्हा

वाडा:  तालुक्यातील तिळसा येथे तीन दिवसाची नवजात बालिका रविवारी वैतरणा नदीकाठी एका शेतात जिवंत आढळून आली. तिला उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले मात्र बुधवारी तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

निर्दयी अज्ञात माता-पिता विरोधात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी तिळसा येथील नदी किनारी असलेल्या नारायण डुकले यांना त्यांच्या शेतात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एक तीन दिवसाचे जिवंत स्री जातीचे अर्भक कोणीतरी ठेवल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना खबर दिली असता या मुलीस प्रथम ग्रामीण रुग्णालय वाडा व नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले होते.   या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात माता पिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अलका करडे करत आहेत.