News Flash

पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून

या निर्दयी पित्याने दोन वर्ष वयाच्या शैलेशलाही नाक व तोंड दाबून ठार मारले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पत्नीने हिणवल्याचा राग आल्याने संतप्त पतीचे कृत्य

‘तू मला पसंत नाहीस’ असे म्हणून सातत्याने पत्नीने हिणवल्याचा राग मनात ठेवून पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून केला. शहरापासून जवळच असलेल्या कासारखेडा येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नांदेडपासून जवळच असलेल्या कासारखेडा येथे गायकवाड यांचे घर आहे. सोमवारी सायंकाळी मोलमजुरी करून घरी परतलेल्या जीवन नागोराव गायकवाड (वय २५) व त्याची पत्नी सत्त्वशीला (वय २१) यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. परंतु हा वाद वरचेवर वाढतच गेल्याने जीवनने पत्नीला मारहाण केली. ‘तू मला पसंत नाहीस’ असे म्हणून पत्नी हिणवत असल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यानंतर किरकोळ स्वरूपाचे हे भांडण विकोपाला गेले. काही वेळानंतर जीवनने सर्वाना कासारखेडा ते कामठा रस्त्यावर असलेल्या धरमसिंग बुंगई यांच्या शेताजवळ आणले. तेथे जाताच त्याने सत्त्वशीलावर चाकूने वार केले. वार केल्यानंतरही सत्त्वशीला जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर जीवनने तिचा स्कार्फने गळा आवळला.

एवढेच नाही तर या निर्दयी पित्याने दोन वर्ष वयाच्या शैलेशलाही नाक व तोंड दाबून ठार मारले. क्रोधाची परिसीमा गाठलेल्या आरोपी जीवनचे समाधान झाले नाही. त्याने आपल्या दीड महिन्याच्या कोवळ्या मुलीसही थापडबुक्याने मारहाण करून तिचाही गळा दाबला व तिचे प्रेत बाजूच्या गवतामध्ये फेकून दिले.

या प्रकरणी पोलीस पाटील सुनंदा यशवंतराव इंगोले यांनी मंगळवारी सकाळी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी जीवनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. एल. दंतुलवार करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:52 am

Web Title: crime news in nanded
Next Stories
1 चंद्रपूर येथे महाविद्यालयीन तरूणीवर बलात्कार करून खून
2 अमरावतीच्या ‘टेक्स्टाइल पार्क’समोर अनेक अडचणी
3 परभणी शिवसेनेत सुंदोपसुंदी
Just Now!
X