परदेशत विशेषत: आखाती देशात मोठय़ा पगाराची नोकरी देतो, असे आमिष दाखवून फसवणाऱ्या आणखी एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपी गजाआड केले. या टोळीने महाराष्ट्रासह पंजाब, ओरिसा, बिहार, गुजरात येथील तरुणांचीही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

मशीद बंदर स्थानकाशेजारील पटवा चेंबर्स या इमारतीत कार्यालय थाटून भामटय़ांनी अनेक राज्यांतील तरुणांची फसवणूक सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष एकचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांना मिळाली होती. कक्षातील पोलीस निरीक्षक महेश तावडे, सहायक निरीक्षक अनंत शिंदे आणि पथकाने या माहितीची खातरजमा करून फसवणूक झालेल्या तरुणांपैकी दोघा-तिघांना विश्वासात घेतले. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पटवा चेंबर्स इमारतीतील संबंधित कार्यालयात छापा घालून अक्रम शेख आणि शाबीर अकबर मास्टर ऊर्फ मुन्ना या दोन आरोपींना अटक केली.

या दोघांनी आखाती देशांतील नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांकडून आगाऊ रक्कम स्वीकारली होती. परदेशी कंपन्यांची बनावट कागदपत्रे, बनावट व्हिसा तयार करून हे आरोपी या तरुणांकडून उर्वरित पैसे स्वीकारून पसार होण्याचा कट आखत होते. त्यांच्या अटकेने अनेक तरुणांची फसवणूक रोखली गेली.