• प्रेयसीच्या मित्रावर धारदार चाकूने वार

मुंबई : प्रेयसी अन्य तरुणासोबत बोलत असल्याचे सहन न झाल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी सुनील ठाकूर (२१), नीरव मखवाना (२१), करण पवार (२०) यांना अटक केली असून आशुतोष पुरी फरारी आहे.

आशुतोष आणि इतर आरोपी मुले ठाकूर महाविद्यालयात शिक्षण घेतात. आशुतोष आणि एका मुलीची मैत्री होती. मात्र ही मुलगी अन्य तरुणासोबत मैत्री ठेवत असल्याची गोष्ट आशुतोषला सहन होत नव्हती. याचा राग मनात धरून आशुतोष याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्या तरुणावर चाकू हल्ला केला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती दहिसर पोलिसांनी दिली.

  • गोठिवलीमध्ये चोरांची दहशत

येथील गोठिवली गावामध्ये चोरीचे प्रकार वाढले असून गावकरी दहशतीखाली आहेत. याबाबत गोठिवली गावठाण विस्तार व पुनर्वसन समितीकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीमध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरांनी लुटले होते. त्याचा शोध अद्याप सुरू असून असे चोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी सुरक्षितपणे राहता यावे यासाठी पोलीस मुख्यालयाने या भागात गस्त वाढवावी व नागरिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

  • व्यापाऱ्याकडून १८ लाखांनी फसवणूक ३५ एसी दिलेच नाही

८० नग एसीचा पुरवठय़ाचा करार असताना केवळ ४५ एसीचा पुरवठा करून उर्वरित ३५ एसी न देणाऱ्या हैदराबाद येथील व्यापारी प्रतिष्ठान व संचालकांविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद अहमद, मोहम्मद साजीया, मोहम्मद चांद पाशा, जमील बानो मोहम्मद आणि मोहम्मद नजीया मोहम्मद रियाज सर्व रा. मोहम्मद इंटरप्रायजेस, केअर रेसिडेन्सी, विजयवाडा, हैदराबाद अशी आरोपींची नावे आहेत.

विनोद चिंतामण हेडाऊ (२९) रा. कर्नलबाग, नवीन शुक्रवारी असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचा एसी विक्री व सेवेचा व्यवसाय आहे. याकरिता त्यांनी ८० एसी खरेदीचा करार आरोपींच्या कंपनीशी केला होता. त्याकरिता ३३ लाख ७५ हजार रुपये दिले होते. पण, आरोपी त्यांना एसी पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. महत्प्रयासाने त्यांना ४५ एसी पाठवल्या. उर्वरित ३५ एसी अद्याप दिल्या नाहीत. हेडाऊ यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला. २७ एप्रिल २०१९ ला आरोपींनी हेडाऊ यांच्या नावाने बनावट देयक तयार करून त्यांच्या मागणीतील २५ एसी दुसऱ्या कंपनीला विकल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • सोनसाखळी चोरास दोन वर्षे कारावास

पालघर : सफाळे परिसरात सोनसाखळी चोरी केलेल्या एका आरोपीस न्यायालयाने दोन वर्ष कारावास व रोख रोख रक्कम दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सफाळे पोलीस ठाणे अंतर्गत २०१३ मध्ये दर्भेपाडा येथे राहणाऱ्या शिल्पा रिंजड व त्यांची सासू ह्य घरी जात असताना मागून येणाऱ्या आरोपी प्रभाकर बबन गिराने, रा. सारतोडी याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले होते.  या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात न्यायालयात सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले.   याप्रकरणी सरकारी वकील शहा व गुन्हे अन्वेषण अधिकारी आर. बागवान यांनी काम पाहिले.

  • शेअर दलालाची आत्महत्या

मुंबई : भांडवली बाजारातील दलाल मनीष ठक्कर यांनी गुरुवारी रात्री मुलुंड येथील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. भांडवली बाजारातील दलालीच्या व्यवसायातील तोटय़ामुळे मनीष गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्येच्या गर्तेत होते. त्यांच्यावर मनोविकारतज्ज्ञांचे उपचारही सुरू होते. रात्री १५व्या मजल्यावरील गच्ची त्यांनीच उघडली आणि काही क्षणात त्यांनी स्वत:ला खाली झोकून दिले. त्यांचे नैराश्य आणि उपचार याबाबत कुटुंबानेच पोलिसांना माहिती दिली. मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील बहुमजली इमारतीत मनीष पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते.