||  हर्षद कशाळकर

गावातील एका घरात एकटय़ाच राहणाऱ्या महिलेच्या घरी जबरी चोरी करून गावाकडे निघून जाण्याचा बेत त्याने आखला होता. ठरल्याप्रमाणे मध्यरात्री त्याने आपला कट तडीसही नेला. मात्र, या धावपळीत त्याने चोरून आलेले एक कर्णाभूषण मागे राहिले. हाच कानातला दागिना त्याच्या अटकेसाठी पोलिसांना उपयोगी ठरला..

अलिबाग तालुक्यातील आवास गावात राहणाऱ्या प्रभावती सीताराम म्हात्रे या ८६ वर्षीय वृद्धेची तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. तिच्या अंगावरील दागिने मारेकऱ्यांनी पळवून नेले होते. प्रथमदर्शनी तपास करून पोलिसांनी चोरी आणि हत्येप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गणेशोत्सवादरम्यानची. त्यामुळे परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. मांडवा पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समांतर तपासाच्या सूचना देण्यात आल्या.

प्राथमिक तपासात हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली होती. मात्र अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेणे त्यांच्या समोरचे मोठे आव्हान होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तपासकामी कार्यरत केली होती. गुप्त खबऱ्यामार्फत माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले. या दुसऱ्या बाजूला आसपासच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. संशयीत लोकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली. मात्र ठोस माहिती हाती लागत नव्हती. गुन्हेगारापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होत होते.

अशातच गावातील हातगाडीवर मका विकणारा कुबेर पांडे नावाचा तरुण गायब असल्याची माहिती समोर आली. तपासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब होती. अचानक बेपत्ता झालेल्या या तरुणाचा शोध घेणे आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागची कारणे शोधणे आता गरजेचे

होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तो आवासमध्ये जिथे राहायचा तिथे चाचपणी सुरू केली. घरझडतीदरम्यान एक सोन्याचे कानातले त्यांना तिथे आढळून आले. त्याला रक्त लागले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे अज्ञात मारेकऱ्यापासून सुरू झालेला पोलीस तपास आता कुबेर पांडेभोवती स्थिरावला. तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

पोलिसांनी पांडे याच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यांच्याकडून माहिती संकलित केली. तेव्हा तो उत्तर प्रदेशमध्ये गेला असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. आधुनिक तंत्राची मदत घेतली गेली. यानंतर सापळा रचून त्याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला त्याने आपण हा गुन्हा केलाच नसल्याचा कांगावा सुरू केला मात्र पोलीसांनी हिसका दाखवताच त्याने आपल्या काळ्या कृत्याची कबुली दिली. कुबेर ऊर्फ मोबाइल अजरा पांडे हा तरुण गेली पंधरा वर्षे आवास परिसरात राहात होता. हातगाडीवर मका विकून तो आपला चरितार्थ चालवत होता. मात्र यातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प होते. दिवसाकाठी होणारी कमाई दारूच्या व्यसनावर खर्च होत होती. यातून नैराश्याने त्याला ग्रासले होते. लहानसहान चोऱ्या करणे सुरू केले. गावातील एका व्यक्तीची सायकल त्याने चोरून आणली होती. हिबाब घरमालकाच्या लक्षात आल्यावर त्याने मोबाइल पांडे याला घर सोडून गावाकडे परत जण्याचे निर्देश दिले होते. पण गावाकडे परतण्यासाठी त्याच्याकडे पैसेच शिल्लक नव्हते. त्यामुळे आवासमध्ये एकटय़ाच राहणाऱ्या प्रभावती म्हात्रे यांच्या घरी चोरी करण्याचा बेत त्याने आखला. मध्यरात्री घरात घुसून त्याने प्रभावती म्हात्रे यांची गळा दाबून हत्या केली. त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. भाडय़ाने राहात असलेल्या खोलीवर येऊन सामानाची बांधाबाध केली. याच धावपळीत प्रभावती म्हात्रे यांचे चोरून आणलेले कानातले खोलीत पडले. नेमके ते पोलिसांच्या हाती लागले. आणि या खुनाचा उलगडा झाला.

तपासात दाखवलेले सातत्य आणि गतिशीलता फळाला आली. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करून पोलिसांनी या गुन्ह्याची अखेर उकल केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक जे.ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदार शेवते, हंबीर, पाटील, पिंपळे, पोलीस नाईक कराळे, सावंत, शेलार, येरूणकर तर मांडवा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके आणि त्यांच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

harshad.kashalkar@expressindia.com