पालघर/बोईसर : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या मालाचा साठा करून विक्री करणाऱ्या निशाकांत शहा या आरोपीसह दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या मालाचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तो रहात असलेल्या गणेश नगर परिसरातील एका इमारतीमध्ये छापा मारला असता मुद्देमाल आढळून आला.

यामध्ये विविध कंपनीच्या गुटख्याची पाकिटे व तंबाखूची पाकिटे असा दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून शहा याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिसरामध्ये यापूर्वीही महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असणाऱ्या तंबाखू व गुटख्याची तस्करी होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच किरकोळ विक्रीही होत आहे.