गेल्या एप्रिल आणि मे महिन्यांत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेच्या अंतर्गत महावितरणने जालना जिल्ह्य़ातील चारशेपेक्षा अधिक ग्राहकांविरुद्ध वीज चोरीच्या आरोपावरून गुन्हे नोंदविले आहेत.
अनधिकृतरीत्या वीज घेणे, मंजूर भारक्षमतेपेक्षा अधिक भाराचा वापर करणे, एका उद्देशासाठी वीज जोडणी घेऊन तिचा अन्य कामांसाठी अनधिकृत वापर करणे, मीटरमध्ये बदल करणे, आकडे टाकून वीज घेणे इत्यादी आरोपांवरून हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महावितरणचे औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. एप्रिल व मे या दोन महिन्यांत जालना जिल्ह्य़ात विजेच्या संदर्भातील कायद्यांचा भंग झाल्याची ५८५ प्रकरणे उघडकीस आली. ही बहुतेक प्रकरणे वीज चोरीची आहेत. वीज चोरणाऱ्यांकडून जिल्ह्य़ात ४ लाख १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर ३५ लाख ४१ हजार रुपये वीजबिलाची आकारणी करण्यात आली.
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात जालना व औरंगाबाद (ग्रामीण) हे दोन विभाग येतात. एप्रिल व मे महिन्यांत औरंगाबाद (ग्रामीण) विभागात ६६४ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. २७ लाख रुपयांच्या बिलांची आकारणी करण्यात आली, तर २० लाख रुपये दंडाची वसुली करण्यात आली. औरंगाबाद (ग्रामीण) विभागात वीजचोरीच्या आरोपावरून ३०५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. विजेच्या संदर्भातील गुन्ह्य़ांसाठी जालना येथे स्थापन झालेल्या पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही जिल्ह्य़ांतील गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली आहे.
महावितरणमधील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; वीजपुरवठा महिन्यापासून ठप्प
वार्ताहर, उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी गावापासून जवळ असलेल्या झिरकातांडय़ाचा विद्युतपुरवठा तब्बल एक महिन्यापासून बंद आहे. लेखी, तोंडी सांगूनदेखील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, गावाचा पाणीपुरवठाही महिन्यापासून ठप्प झाला असून, पाणी असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.
झिरकातांडा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबाला एक महिन्यापूर्वी एका टँकरने धडक दिल्याने खांब आणि तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. संबंधित वीज कर्मचाऱ्यास सांगून तो दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु त्यांनी विविध कारणे सांगून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गावकऱ्यांनी तुळजापूर येथील कार्यकारी उपअभियंत्यांकडे लेखी तक्रार देऊन गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.  महिन्यापूर्वी तुटलेला विजेचा खांब आजपर्यंत तशाच स्थितीत जागेवर पडून आहे.