पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध मीरा रोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार गावित यांची मीरा रोड पूर्वेला ‘देव मोगरा’ नावाची गॅस एजन्सी आहे. तक्रारदार महिला या एजन्सीमध्ये काम करते. एजन्सीत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटून आल्यानंतर या महिलेने गावित यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली.

नोव्हेंबर महिन्यात कार्यालयातील बैठकीत वाद झाल्यानंतर गावित यांनी सर्वासमक्ष विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. या तक्रारीवरून गावित यांच्यावर कलम ३५४ (अ) अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आरोप बिनबुडाचे असल्याचे खासदार गावित यांनी म्हटले आहे. तक्रारदार महिलेने एजन्सीत १ कोटींची अफरातर केली होती. तिची चोरी रंगेहाथ पकडून दिली होती. त्यामुळे तिने सूडबुद्धीने खोटी तक्रार दिल्याचे गावित यांनी सांगितले.