गोंदिया : घरी एकटय़ा असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वॉर्डात काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या खुनाचे गूढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ज्योत्स्ना गणेश जुमळे (३०, रा. बेलघाट वॉर्ड, पवनी, जि. गोंदिया) असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पती गणेश रामदास जुमळे घरी आला तेव्हा पत्नी मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून झाल्याचे लक्षात आले. रात्रीच पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, ज्योत्स्नाचा भाऊ  गोकुळदास काटेखाये (४३, रा. खातखेडा) यांनी याप्रकरणी संशय व्यक्त करीत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पती गणेश रामदास जुमळे (३५), उमेश रामदास जुमळे (३०), मंगेश रामदास जुमळे (२८), चिंधाबाई रामदास जुमळे (५५) आणि रामदास जुमळे (६०) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वाना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, खुनाचे गूढ कायम असून नेमका खून कशासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. ज्योत्स्नाचे शवविच्छेदन पवनी येथे करण्यास नातेवाईकांनी मनाई केली. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शव विच्छेदन करावे, अशी मागणी केली. त्यावरून मृतदेह नागपूर येथे विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या गुन्ह्यचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.