सेनगाव येथे वाळूवाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यानंतर दंडाची रक्कम भरण्याची सूचना केल्यावरून सेनगावचे तहसीलदार मेंढके यांना भाजपचे शाखा उपाध्यक्ष अशोक ढेंगल याने मारहाण केली. या प्रकरणी ढेंगलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे या घटनेचा निषेध केला.
सेनगाव येथे बेकायदा वाळू उपशाविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तहसीलदार मेंढके यांच्या पथकाने सोमवारी वाळूची अवैद्य वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात लावले. दुपारी तीनच्या सुमारास वाहतूकदार अशोक दगडूजी ढेंगळे यास १२ हजार २०० रुपये दंड भरण्यास तहसीलदारांनी सांगितले. वाहतूकदाराने, दंडाची रक्कम भरण्याइतकी परिस्थिती नाही. अत्यंत हलाखीची स्थिती आहे, असे सांगून दंड कमी करण्याची विनंती केली. त्याला १० हजार २०० रुपये दंड भरण्याची सूचना मेंढके यांनी केली. वाहतूकदाराने ती मान्यही केली.
तहसीलदार कार्यालयातील बठकीसाठी निघून गेले. दरम्यान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक ढेंगल (सुकळी बु.) याने कार्यालयात घुसून मेंढके यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. ‘तुला काम सांगतो, ते तू ऐकत नाहीस. तुझ्यासारखे तहसीलदार माझ्या खिशात घेऊन फिरतो’, अशा भाषेत आरोपी ढेंगल याने वर्तन केल्याचे मेंढके यांनी या प्रकरणी लेखी अहवालात कळविले, तसेच या प्रकरणी सेनगाव पोलिसांत तक्रारही दिली. पोलिसांनी ढेंगलविरुद्ध गुन्हा दाखल केला. महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या सह्य़ा आहेत.