वाळू ठेकेदारावर कारवाई केल्यानंतर जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी न्यायालयात ठेकेदाराच्या बाजूने मत नोंदविण्यासाठी पोलीस नाईक योगेश बाबुराव ताठे याने १० हजारांची लाच मागितली. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस नाईक ताठेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या वर्षी जुलैमध्ये गंगापूर तालुक्यातील नेवर गाव येथे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली होती. वाळू ठेक्यातील स्वामित्व हक्काच्या वेगवेगळ्या प्रती जप्त केल्यानंतर त्यात गफलत असल्याचे दिसून आले. त्या आधारे मालमोटारचालक व मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मालमोटार जप्त करण्यात आली व ती गंगापूर पोलीस ठाण्यात लावण्यात आली होती. ही मालमोटार मालकांना परत करताना न्यायालयात त्यांच्या बाजूने म्हणणे सादर व्हावे, या साठी पोलीस नाईक ताठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. चोपडे व शामसुंदर कौठाळे यांनी ही कारवाई केली.