पतीच्या मालकीचे वाहन भाडय़ाचे दाखवून महापालिकेच्या तिजोरीतून रक्कम उचलल्याप्रकरणी तत्कालीन उपआयुक्त विद्या गायकवाड व त्यांचे पती किशोर सुरवसे यांच्यावर संगनमत करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या श्रीमती गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
थेट एमपीएससी उत्तीर्ण होऊन महापालिकेच्या सेवेत उपायुक्त म्हणून दाखल झालेल्या विद्या गायकवाड यांच्याकडे महसूल विभागाची सूत्रे होती. महसूल विभागाचे उपायुक्त म्हणून गायकवाड यांना ५० हजार रुपये इतक्या रकमेचा वाहनभत्ता म्हणून वितरण करण्याचा अधिकार होता. तसेच महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी स्वतचे वाहन वापरल्यास त्यांना नियमाप्रमाणे मासिक ११ हजार रुपये वाहनभत्ता देण्यात येत होता.
तत्कालीन उपायुक्त विद्या गायकवाड यांनी त्यांचे पती व पूर्णा (जिल्हा परभणी) तालुक्यातील कावलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. किशोर सुरवसे यांच्या मालकीचे वाहन (एमएच २६ व्ही  ६५०७) भाडय़ाने घेतले, असे दाखवून जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या ४ महिन्यांच्या कालावधीत वाहनभत्ता म्हणून तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम उचलली. प्रत्यक्षात हे वाहन त्यांच्या पतीच्या मालकीचे असताना त्यांनी नियमाप्रमाणे दरमहा ११ हजार रुपये वाहनभत्ता म्हणून उचलणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता टुरिस्ट कंपनीकडून वाहन भाडय़ाने घेतल्याचे दाखवत जादा रक्कम उचलली. तसेच या साठी आरटीओ कार्यालयाची परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. महसूल विभागाचे प्रमुख या नात्याने व वाहनभत्ता वितरणाच्या अधिकाराचा गरवापर करून गरमार्गाने रक्कम उचलली. या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय अनंतवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस स्थानकात विद्या गायकवाड व डॉ. अशोक सुरवसे या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.