शहरात केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ५४ मध्ये कामे न करता बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील प्रभाग क्रमांक ५४ मधील व नव्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक ३० मधील दगडी नाला बांधकाम प्रकरणी कामे न करता ७ लाख ७४ हजार रुपये उचलण्यात आल्याची तक्रार काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नागेश सोनपसारे यांनी केली होती. या संदर्भात न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालिन मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, शाखा अभियंता बालासाहेब दुधाटे, शहर अभियंता रामराव पवार, ठेकेदार शाम ठाकूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील कोतवाली पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एल. नवले हे तपास करीत आहेत. अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत नीलेश कांबळे ते शेख वाजेद यांचे घर अशा नाला बांधकामासाठी ९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवली होती. मात्र संबंधित ठिकाणी कागदपत्रावरच काम करून ७ लाख ७४ हजार ६१३ रुपये एवढय़ा रकमेचा अपहार केल्याची नोंद या गुन्ह्यात आहे.