केबीसीच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडे दाखल १०३ तक्रारदारांच्या तक्रारी, तसेच ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केबीसीचा संचालक नानासाहेब चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, साधना चव्हाण व संजय जगताप यांना पोलिसांनी नाशिकहून परभणीत आणले. या सर्व आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली.
परभणी जिल्ह्यात केबीसीच्या दामदुप्पट, तिप्पट व चौपट योजनेच्या जाळ्यात हजारो गुंतवणूकदारांनी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु जानेवारीपासूनच केबीसीने परतावा देणे बंद केल्यानंतर एक महिन्यापूर्वी बालासाहेब तिडके यांच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा कोतवाली पोलिसात दाखल झाला. दरम्यान, नाशिक येथेही केबीसीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण आदींवर गुन्हे दाखल झाले. मात्र, दोघे पती-पत्नी विदेशात फरारी असून, इतर आरोपींना मात्र अटक केली. नाशिक पोलिसांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी नाशिकला जाऊन चार आरोपींना ताब्यात घेतले. शुक्रवारी या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, येथील प्रवीण हनुमंतराव जोशी व रागिनी प्रवीण जोशी यांनी केबीसी अँड रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीत ४ लाख रुपये गुंतवले होते. कंपनीने दोन वषार्ंत पाचपट रक्कम देण्याचे आमीष दाखवले. मात्र, फसवले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने जोशी दाम्पत्याने अॅड. जितेंद्र घुगे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भाऊसाहेब चव्हाण, विशाल पाटील, आरती चव्हाण, सागर जगताप, कौशल्या जगताप, बाबु चव्हाण, साधना चव्हाण, निलेश चव्हाण, कविता चव्हाण, संदीप जगदाळे, सुनील आहेर, सागर पाटील, पंकज िशदे, कृष्णा चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, वामन जगताप, छबू चव्हाण, राजाराम िशदे, बाजीराव िशदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाने नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
‘पीएसपीएस’मधील आरोपीच्या कोठडीत वाढ
पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीचा मुख्य सूत्रधार रवींद्र डांगे व त्याचे साथीदार रमेश हरिश्चंद्र पांचाळ, शेख वाहेद गफुरोद्दीन, परवेज अब्दुल रहीम, रमेश दिलाराम परदेशी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ४ दिवसांची वाढ केली. या आधी आरोपीकडून स्विफ्ट मोटारीसह काही रक्कम गुन्हे शाखेने जप्त केली.