काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे या दोन गटात झालेल्या दगडफेक प्रकरणी गोरे बंधूंसह त्यांच्या शंभराहून अधिक समर्थकांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंधळी (ता. माण) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी निवडीदरम्यान ही दगडफेक झाली होती.
गुरुवारी आंधळी सोसायटी पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित राहिल्याने दोन्ही गटातील वातावरण चिघळले होते. दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने येत घोषणाबाजी करीत होते. यावेळी संयम सुटलेल्या समर्थकांनी दगडफेक करून हाणामारी केली होती तसेच, पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणाबाबत सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. कवडे यांनी फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार शासकीय आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दंगल, मारामारी, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आदी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंधळी प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. संशयितांचा कसून शोध जारी आहे.