वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घुसून दमदाटी करीत सर्वसाधारण सभेच्या रजिस्टरवर बनावट सह्या केल्याप्रकरणी कार्यालयीन अधीक्षक विष्णू कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे नेते संचालक पंडितराव मुंडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यावर धरणे आंदोलन सुरू केले. माजी सभापती नारायण पारवे यांच्या तक्रारीवरून कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह तीन जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या मुंडे कुटुंबातील बहीण-भावातील सत्तासंघर्ष पेटला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक मुंडे यांच्या निधनानंतर प्रथमच होत आहे. कारखान्याची सत्ता कायम ठेवण्यासाठी मुंडेंच्या वारस ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, तर सत्ता मिळवण्यासाठी पुतणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष सुरू झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नेते जि. प.चे माजी अध्यक्ष पंडितराव मुंडे यांनी कारखान्यात घुसून सर्वसाधारण सभेचे रजिस्टर ताब्यात घेऊन बनावट सह्या करीत मारहाण केल्याची तक्रार कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक विष्णू कुलकर्णी यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. सायंकाळी ग्रामविकासमंत्री मुंडे परळीत डेरेदाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा पंडितराव मुंडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल करण्यास व तो दाखल होऊ नये या साठी पोलिसांवर मोठय़ा प्रमाणात राजकीय दबाव वाढला होता.
पंडितराव मुंडे हे धनंजय मुंडे यांचे वडील असून धनंजयही शहरातच तळ ठोकून होते. रात्री गुन्हा दाखल होताच सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गुन्हा मागे घेण्याची मागणी करीत ठिय्या दिला. माजी सभापती नारायण पारवे यांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्यावरून कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय कुलकर्णी, विष्णू कुलकर्णी यांच्यासह तीन जणांविरुद्ध पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, वाल्मिक कराड यांच्यासह अनेक कार्यकत्रे ठाण्यासमोर ठाण मांडून होते.
कारखाना निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंडे कुटुंबातील सत्तासंघर्ष पेटल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. शहरात तणावग्रस्त वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.