जिंतूर येथील डॉक्टर दाम्पत्याचे अपहरण करून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गोवर्धन सीताराम मुंढे असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
जिंतूरच्या शिवाजीनगर येथे राहणारे देव आटवाल व सीमा आटवाल या डॉक्टर दाम्पत्याचे तुकाई मंगल कार्यालयाजवळ रुग्णालय आहे. आटवाल यांच्या घरासमोर मुंढे हा सुक्की भोगाव येथील जि. प. शाळेतील शिक्षक राहतो. ओळखीतून सीमा आटवाल यांनी मुंढे याच्याकडून तीन महिन्यांपूर्वी १८ हजार रुपये हातउसने घेतले होते. पकी १० हजार रुपये परत दिले. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंढेने आटवाल यांच्या घरी येऊन बीड जिल्ह्यातील धारूर येथे पॅरालिसीसचा रुग्ण आहे, त्याला चालता फिरता येत नसल्याने तुम्ही माझ्यासोबत चला, असे म्हणून मोबाईलवर एकाशी संपर्क साधून दिला. समोरील व्यक्तीनेही ४-५ वर्षांपासून आपण तुमच्याकडे उपचार घेत आहोत, असे सांगून धारूरला येण्याची विनंती केली. त्यामुळे आटवाल पती-पत्नी व मुंढे मोटारीने धारूरला निघाले. परंतु धारूरच्या पुढे १५ किलोमीटर अंतरावर रुग्णाचे गाव आहे, असे सांगून मुंढेनी गाडी केजकडे वळविण्यास सांगितली. केजला क्रांतीनगर भागातील रब्बानी याच्या घरी पोहोचल्यावर डॉ. आटवाल यांनी रुग्ण कुठे आहे, अशी विचारणा करताच मुंढे याने एक लाख रुपये द्या, अन्यथा दगडाने डोके ठेचून जीवे मारून टाकील आणि डॉ. सीमा यांना कोंडून ठेवील, अशी धमकी देत पशाची मागणी केली. या प्रकारामुळे डॉ. सीमा यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. याच वेळी आजूबाजूला असलेल्या महिलांनी रब्बानी याच्या घरी धाव घेतली व पोलिसांना बोलावून घेतले. स्थानिक पोलिसांनी मुंढेला ताब्यात घेऊन डॉक्टर दाम्पत्याला जिंतूरला पाठवून दिले. जिंतुरात आल्यानंतर डॉ. सीमा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुंढेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.