पलूस पंचायत समितीच्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदीप राजोबा यांना झालेल्या बेदम मारहाणप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांसह पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या संदीप राजोबा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात अतिदक्षता विभागात रविवारी दाखल करण्यात आले.
    जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या समोरच शनिवारी आमसभेमध्ये संदीप राजोबा ऊसदराबाबत विचारणा करीत असताना कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी रात्री उशिरा पलूस पोलीस ठाण्यात महेंद्र लाड, जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील, मोहन तावदर, विक्रम पाटील, विजय आरगुणे या पाच जणांविरुद्ध दर्दी मारामारीचा गुन्हा भारतीय दंडविधान ३२४ अन्वये दाखल करण्यात आला आहे. तर पालकमंत्री डॉ. कदम यांच्या बंगल्यावर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांच्यासह सचिन तानाजी पाटील, विशाल िशदे, सनद पाटील, संदीप चौगुले यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दरम्यान, संदीप राजोबा यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून उपचारासाठी मिरजेतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्यांच्या छातीच्या बरगडय़ांना गंभीर इजा झाली असल्याने रविवार सकाळपासून श्वासोच्छ्वास करण्यास अडथळे निर्माण होऊ लागले. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार इस्पितळात दाखल करण्यात आले असून, या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.