सोलापूर-पुणे महामार्गावर उजनी धरणाजवळ कालव्यात ट्रॅक्टर ट्रॉली कोसळून घडलेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातजणांपैकी पाचजणांचे मृतदेह गुरुवारी सापडले. आणखी दोघाजणांचा शोध ४० तास उलटून गेले तरी लागला नाही. मृत व्यक्ती ऊसतोड मजूर व त्यांची मुले असून ऊसतोडीचे काम अर्धवट सोडून मूळगावी निघालेल्या या मजुरांचा मुकादमाने पाठलाग केल्यामुळे धावपळीत चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली वाहत्या पाण्याच्या कालव्यात कोसळली. या प्रकरणी ऊसतोड मजूर टोळीच्या मुकादमाविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल बुधवारी तीनच्या सुमारास उजनी धरणाजवळ रांजणी गावालगत डाव्या कालव्यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळून त्यात नऊजण वाहून गेले होते. यातून राजू सर्जेराव मोरे (३५) व अंबादास सीताराम गुंजाळ (३४) हे दोघे सुदैवाने बचावले. उर्वरित सातजणांचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यापैकी पाचजणांचे मृतदेह हाती लागले. कविता बाळासाहेब गुंजाळ (२५) व तिचा मुलगा शुभम (५) तसेच हिराबाई राजू मोरे (२५) व तिची मुले आजू राजू मोरे (६) आणि कार्तिक राजू मोरे (४) अशी त्यांची नावे आहेत. सुरेखा अंबादास गुंजाळ (३०) व ट्रॅक्टरचालक बाळासाहेब जगन्नाथ गुंजाळ (३०) यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागला नव्हता. हे सर्वजण अहमदनगर जिल्ह्य़ातील दहिगाव (ता. शेगाव) येथील राहणारे होते. सध्या त्यांचा मुक्काम आलेगाव (ता. माढा) येथे होता.
कालव्यात उजनी धरणातून तीन हजार क्युसेक्स इतक्या विसर्गाने पाण्याचा प्रवाह असल्यामुळे  मदतकार्यात अडचण निर्माण झाली होती. मदतकार्यासाठी तीन यांत्रिक बोटींसह पाणबुडे व पट्टीच्या जलतरणपटूंची मदत घेण्यात येत असताना अखेर मृतांपैकी चारजणांचे मृतदेह दुर्घटनास्थळापासून जवळच म्हणजे रांजणी गावाजवळ सापडले. तर कविता गुंजाळ हिचा मृतदेह सुमारे २० किलोमीटर अंतरावर महाळुंग येथे सापडला.
हे सर्व ऊसतोड मजूर माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोडीकरिता टोळी मुकादम बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यासोबत आले होते. परंतु ठेकेदाराकडून आगाऊ स्वरूपात रक्कम मिळाली नव्हती. तसेच प्रत्यक्ष पुरेसे कामही मिळत नव्हते. तेव्हा ट्रॅक्टरचालक बाळासाहेब गुंजाळ यांनी मजुरांना स्वत:जवळील एक लाख रुपये उचल म्हणून दिले होते. मुकादम चंदनकर यांच्याकडून उचलही मिळत नाही आणि पुरेशा प्रमाणात कामही दिले जात नाही म्हणून सर्व मजुरांनी ऊसतोड न करता मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. पहाटे संसारोपयोगी सामानासह सर्व मजूर आपल्या लेकरा-बाळांसह ट्रॅक्टर-ट्रॉलीतून आलेगाव सोडून आपल्या गावाकडे निघाले. परंतु त्याची माहिती मिळताच मुकादम बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर या दोघांनी या मजुरांना मूळ गावाकडे जाऊ न देण्यासाठी बोलेरो गाडीतून त्यांचा पाठलाग सुरू केला. रांजणीजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करून मुकादम चंदनकर पुढे गेले व थांबून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या दिशेने दगड भिरकावले. तेव्हा घाबरलेल्या ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेला मुकादम बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर हे दोघे कारणीभूत असल्याचे दिसून आल्याने या दोघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.