X

तपास चक्र : लोभाची बळी

माणगाव तालुक्यात एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने सारेच हादरून गेले होते.

माणगाव तालुक्यात एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने सारेच हादरून गेले होते. आठवडाभरातील दुसरी घटना व ती ही चोरीच्या उद्देशाने झाल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे या प्रकरणाचा त्वरित छडा लावून मारेकऱ्यांना बेडय़ा ठोकणे आवश्यक बनले होते.

माणगाव तालुक्यातील वावे येथील एका आठ वर्षांच्या बालिकेचे हत्या प्रकरण गाजत असतानाच, रवाळजे येथे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात चोरटय़ांनी एका ५० वर्षांच्या परिचारिकेची गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. २९ मे रोजी या महिलेची हत्या करत चोरटय़ांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखांची रोकड लांबवली होती. एका आठवडय़ात घडलेल्या खुनाच्या या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेविषयी आणि पोलिसांच्या दक्षतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या चोरीचा व खुनाचा छडा लावणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांची या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर तपासासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली गेली. माणगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे एक पथक तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे दुसरे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.

माणगाव तालुक्यातील रवाळजे येथील मयत अरुणा विठोबा उभारे (५०) या महिला पाली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करीत होत्या. लग्नानंतर सहा महिन्यांत त्यांचा काडीमोड झाला होता. तेव्हापासून त्यांचे मूळ गाव रवाळजे येथे आपल्या या निवासस्थानी त्या एकटय़ाच राहात होत्या. २९ मे रोजी राहत्या घरी त्यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले. घरातून तीन लाखांचा ऐवज लंपास झाल्याचे अरुणा यांचे नातेवाईक रमेश शंकर मेंगडे यांनी केलेल्या फिर्यादित म्हटले होते.

चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. घरातील स्नानगृहाच्या खिडकीची जाळी काढून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला असावा व नंतर तिची हत्या करून ऐवज नेला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी चोरी आणि घरफोडी प्रकरणातील अट्टल गुन्हेगारांची चौकशी सुरू केली. परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र यातून काहीच माहिती मिळू शकली नाही. तपासातील गुंता वाढत चालल्याने पोलीसही चक्रावून गेले.

आधीच आठ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणाचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले होते. अशातच अरुणा यांची हत्या झाल्याने वातावरण अधिकच तापले होते. नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. त्यामुळे खुनाची उकल होणे गरजेचे होते. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना एक गोष्ट खटकली. स्नानगृहाच्या खिडकीची जाळी बाहेरून तोडण्याऐवजी आतून तोडण्यात आल्याचे दिसून येत होते. खिडकीचा आकार पाहता तेथून आतमध्ये प्रवेश करणेही कठीण दिसत होते. हे लक्षात आल्यानंतर या घटनेतील चोरी हा केवळ बनाव तर नाही ना, अशी शंका तपास अधिकाऱ्यांना आली.

पोलिसांनी अरुणा यांचे शेजारी तसेच नातलगांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. तसेच खबऱ्यांमार्फत नवीन काही माहिती मिळते का, हेही तपासण्यास सुरुवात केली. हत्येच्या रात्री उशिरापर्यंत फिर्यादी रमेश मेंगडे आणि त्यांची पत्नी सुरेखा रमेश मेंगडे हे अरुणा यांच्या घरी होते, अशी माहिती समोर आली. पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी रमेश यांची चौकशी सुरू केली.

सुरुवातीला रमेश याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपणच अरुणा यांची हत्या केल्याचे कबूल केले. रमेश मेंगडे याची पत्नी सुरेखा ही अरुणा यांची बहीण. या दोघांनी मालमत्तेच्या वादातून अरुणा यांची हत्या केली. अरुणा यांना वारस नसल्यामुळे त्यांची मालमत्ता आपल्या मुलांना मिळावी, अशी रमेश आणि सुरेखा यांची अपेक्षा होती. अरुणा यांनीही सुरुवातीला तशी तयारी दर्शवली. मात्र अचानक त्यांच्या मनात दुसऱ्या लग्नाचे विचार घोळू लागले. याबाबत त्यांनी आपल्या बहिणीलाही सांगितले. त्यांचा हा विचार ऐकून मेंगडे दाम्पत्य धास्तावले. अरुणा यांनी दुसरे लग्न केल्यास त्यांची मालमत्ता त्यांच्या पतीला मिळणार, या कल्पनेने हे दोघेही संतप्त झाले. त्यांनी अरुणा यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अरुणा या आपल्या निर्णयावर कायम राहिल्याने या दोघांनी त्यांची हत्या केली. आपल्या कृत्याचा कोणालाही पत्ता लागू नये, यासाठी या दोघांनी चोरीचा बनाव रचला.

घटना स्थळाचा पंचनामा, खबऱ्यांकडून मिळालेली गुप्त माहिती, विविध पातळ्यांवर एकाच वेळी केला तपास आणि तपास कौशल्य यामुळे या गुन्ह्य़ाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. फिर्यादीच आरोपी असल्याचे उघडकीस आले. पोलीस उपविभागीय रोहा अमोल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, साहाय्यक फौजदार श्री खेडेकर, अनिल वडते, पोलीस नाईक स्वप्निल कदम, प्रियंका बुरुंगले, गणेश समेळ यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

harshad.kashalkar@expressindia.com

First Published on: September 12, 2018 4:44 am