नीरज राऊत

‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील पशुपालक आणि मांसविक्रेत्यांनी सतर्क राहावे, असे पत्रक पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेषण विभागाने प्रसिद्ध केले. त्यामुळे करोनापाठोपाठ उपचार उपलब्ध नसलेल्या आणि ३० टक्के मृत्युदर असणाऱ्या काँगो तापाचा प्रसार होणार, अशी अनेकांना मनात भीती निर्माण झाली.  २०११ मध्ये मोजक्या काही व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झाल्याच्या आधारावर हा सर्व खटाटोप पशुसंवर्धन विभागाने केला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात गोंधळ आणि भीती निर्माण झाली.

२२ सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभागाने (पुणे) प्रादेशिक सहआयुक्त, उपआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयांना परिपत्रक जारी करून गुजरातमधील बोताड आणि कच्छ या जिल्ह्य़ांमध्ये काँगो तापाचा प्रसार झाल्याचे सांगत सीमाभागातील राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन राज्यात होण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी, मांसविक्रेते तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले. काँगो, इराण, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी या देशांतही या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. गोचिडामधून होणारा त्याचा प्रसार रोखण्यासाठी सीमावर्ती भागात पशुधन तपासणी नाक्यावर कसून पाहणी करणे, परराज्यातून पशुधन न आणणे तसेच जिल्ह्य़ांमध्ये हे गोचीड निर्मूलन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागांनी जारी केलेल्या परिपत्रकात बाधित जनावराचे मांस खाल्लय़ाने रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो व त्यामुळे योग्य पद्धतीने शिजवून मासे खावे हे असे प्रसिद्ध केल्याने अनेकांनी मांसाहार करण्याचे टाळले व त्याचे परिणाम संबंधित उद्योगांवर दिसून आले.

या संदर्भात केंद्र शासनाकडून तज्ज्ञ समितीने तातडीने पालघर जिल्ह्य़ाचा दौरा केला. त्यांनी काही पशुधन ठिकाणी, तलासरी येथील पशुधन चेक पोस्ट येथे पाहणी केली व जिल्ह्य़ातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या केंद्रीय समिती अशा प्रकारचा आजार सध्या राज्यात व गुजरातमध्ये कुठल्याही ठिकाणी नसल्याचे सांगून भीतीचे कारण नसल्याचे खुलासा केला. या आजाराचा सन २०११ मध्ये दोन-तीन व्यक्तींना संसर्ग झाल्याची माहिती या तज्ज्ञ समितीने अधिकारी वर्गाला दिली.

२०११ मधील आजाराचा दाखला घेऊन २२ सप्टेंबर २०२० मध्ये या संदर्भात परिपत्रक काढून सर्वसामान्य नागरिक, पशुपालक व पशुधनाशी संबंधित सगळ्यांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण केले. असे परिपत्रक काढण्यापूर्वी किंवा त्यांची व्यापक प्रसिद्धी करण्यापूर्वी या आजारात संदर्भात सद्य:स्थितीची माहिती घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता सरसकट करोनापाठोपाठ काँगो फीवर असा सूर धरून जिल्हा प्रशासनाने नेमके काय साध्य केले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मुळात बोताड व कच्छ येथून पालघर जिल्ह्य़ात पशुधन आणले जात नाही, तर म्हशी मेसाणा जिल्ह्य़ातून तर बकऱ्या-मेंढय़ा सुरत व बलसाड जिल्ह्य़ांतून आणल्या जातात हे जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे दिसून येतो. कोणताही पूर्वअभ्यास न करता घाईगडबडीत जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि अनेकांनी मांसाहार करण्याचे बंद केले. परिणामी जिल्हा प्रशासनाला भीती घालवण्यासाठी पुन्हा प्रसिद्धिपत्रक काढणे आवश्यक झाले.

तलासरी अच्छाड येथे पशुधन चेक पोस्ट अधिक सतर्कपणे काम करत असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. मात्र एका ट्रकमध्ये आणण्यात येणाऱ्या १०० हून अधिक शेळ्या-मेंढय़ांची व बकऱ्यांची गोचडी तपासणी त्यांना खाली न उतरता कशा पद्धतीने करता येते हा संशोधनाचा विषय आहे. इतर पशुधन आणताना त्या जनावराचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे. मात्र माहिती असलेल्या आजारांचे लसीकरण केले असल्यास कोणत्याही जनावराला सहजपणे तंदुरुस्ती प्रमाणपत्र दिले जाते अशी माहिती प्राप्त आहे. अशा परिस्थितीत अज्ञात असणाऱ्या किंवा नव्याने उत्परिवर्तन (म्युटेशन) द्वारे नव्या स्वरूपात उभारणाऱ्या आजारांविषयी अशा जुजबी तंदुरुस्ती प्रमाणपत्राच्या आधारे जिल्ह्य़ात प्रवेश देणे कितपत योग्य आहे हा प्रश्नही अनुत्तरित राहिला.

एकंदरीत काँगोच्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे व हाच गोंधळ त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पसरवून त्यांचा मनस्ताप होण्यास कारणीभूत ठरले आहे. करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर काँगो फीवर या आजाराची सध्याची स्थिती कोणतेही असली तरी नागरिकांनी सतर्क व जागरूक राहण्याचे गरजेचे आहे.