सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एका फौजदारासह दोघांना दोन वेगवेगळ्या घटनात लाच घेत असताना रंगेहाथ पकडले. कुरळप पोलीस ठाण्याचे फौजदार रमेश देशमुख हे दहा हजारांची लाच घेत असताना, तर अपंग विकास महामंडळाचा कर्मचारी १ हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद सापडले.
कुरळप (ता. शिराळा) येथील एका बिअरशॉपी चालकाला तू  दारु विकतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगून गुन्ह्यातून वाचविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. शिराळा येथे दारु वाहतूक करणारे वाहन पकडले असून त्या वाहन चालकाने बिअरशॉपी चालकाचे नाव सांगितले आहे, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी फौजदार रमेश देशमुख यांनी दिली होती. प्रकरण मिटविण्यासाठी १० हजार रुपये स्वीकारत असताना बुधवारी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक प्रदीप आफळे, निरीक्षक एच.टी. जाधव यांच्या पथकाने पोलीस ठाण्यातच देशमुख याला रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या प्रकारात अपंग विकास महामंडळाचा वरिष्ठ लिपिक सुरेश गायकवाड याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना सामाजिक भवन येथील कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. या ठिकाणी अपंग विकास महामंडळाचे मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश देण्यासाठी गायकवाड याने फिर्यादीकडे लाचेची मागणी केली होती. बुधवारी याबद्दल एक हजार रुपयाची लाच घेत असताना गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांच्या पथकाने पकडले.