कोल्हापूर: कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून उत्पादन मूल्य किंवा प्रचलित बाजार भावापेक्षा जास्त दराने निविदा मान्य करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या पुरवठादारांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या पुरवठादारांना काळया यादीमध्ये समाविष्ठ असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवले आहे.

जिल्ह्यामध्ये कोव्हिड-१९ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य, औषधे व उपकरणे, तपासणी किट इत्यादीची खरेदी करण्यात आलेली आहे. १२ मार्च रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना आवश्यकतेनुसार औषधे, उपकरणे इत्यादी साहित्य उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

खरेदी प्रक्रिया पुरवठा प्रक्रिया प्रचलित शासकीय नियमाप्रमाणे व पारदर्शक पध्दतीने राबविणे बंधनकारक होते. मात्र काही पुरवठादारांनी मोठया प्रमाणात दर आकारुन निविदा मान्य करून घेतलेल्या आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारीदेखील प्राप्त झालेल्या आहेत. हे सर्व साहित्य, उपकरणे, औषधे यांच्या खरेदीमध्ये अशा प्रकारे तफावत आहे, याची तपासणी करण्यात यावी, जास्त दराच्या निविदा मान्य झाल्या असल्यास ही बाब गैरफायदा घेण्यासाठी केलेली असल्याने तपासणी होऊन कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.