धारणीचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जंगलालगतच्या आदिवासींना वनखात्याविरुद्ध उचकावून त्यांचा हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ गुन्हे दाखल असलेल्या या वादग्रस्त माजी आमदाराच्या कृत्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील भांडूम वनक्षेत्र परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा परिसरातील भांडूम गावाजवळच्या वनजमिनीवरील गावकऱ्यांच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात तणाव आहे. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ही जमीन वनखात्याची नव्हे, तर महसूल खात्याची असल्याचे सांगून आदिवासींना वनहक्क दावे सादर करण्यास सांगितले. त्यासाठी रात्रीतून नांगरणी करण्याचा प्रकार घडला. याच वनक्षेत्रातील हनुमान मंदिराचा आधार घेऊन आदिवासींच्या धार्मिक भावनांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. काही वर्षांंपूर्वी हटकर नावाच्या वनपालाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला वनपालाची नोकरी देण्यात आली. उमेदीने काम करणाऱ्या या मुलाला मारहाण करून पोलीस ठाण्यात आणले. जातिवाचक शिवीगाळीचा आरोप करून कारागृहात टाकले. सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक पंकज गुप्ता यांना या प्रकरणी वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा त्याची सुटका झाली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला घराबाहेर काढून मारहाण केली.
अतिक्रमणाचे हे प्रकरण सुरू असतानाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या हरिसाल ते सेमाडोह या राष्ट्रीय महामार्गावर हरिसालच्या गेटवर वनकर्मचाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या चित्रीकरणाच्या बळावर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पटेलांविरुद्ध तक्रार केली आणि या प्रकरणात त्यांना अटकही झाली. मात्र, जामिनावर सुटलेल्या पटेलांनी पुन्हा आता अतिक्रमण प्रकरणाचा आधार घेतला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात एका गावकऱ्याने तब्बल ७० गाईंना चराईसाठी आणले. त्या गावकऱ्यामागेच पाच कुत्रेही होते. त्याच वेळी गस्तीवर असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी त्या कुत्र्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रे दूर जात नसल्याचे बघून त्यांनी दोन कुत्र्यांना गोळी घातली व घटनेचा पंचनामा केला. गायींसह त्या गावकऱ्यालाही जंगलाबाहेर काढले. नेमके त्याच गावकऱ्याला हाताशी धरून पटेल यांनी गावकऱ्यांवर वनाधिकाऱ्यांनी गोळी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पटेलांच्या या खेळीमुळे जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेलाही धोका पोहोचला आहे.

मारहाण केलेली
नाही – पटेल
‘हरिसाल गेटवर एक महिला आणि तिच्या दोन मुलांना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी ताटकळत ठेवले होते. त्यांना जाऊ का देत नाही म्हणून मी वनकर्मचाऱ्यांना हटकले. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या मुलांना जाऊ दिले. मात्र, त्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार केली. वनकर्मचाऱ्यांना मी मारहाण केलेली नाही,’ असे माजी आमदार राजकुमार पटेल म्हणाले.