News Flash

अमरावतीत गुन्हेगाराची भरदिवसा हत्या

बेसावध असतानाच त्याच्या तोंडावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले

अमरावती : गुन्ह्याशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहून न्यायालयातून घरी जात असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही  घटना शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन (४७) रा. आझादनगर असे मृताचे नाव आहे.

न्यायालयातून निघाल्यावर तो दुचाकीने वालकट मार्गे घराकडे निघाला होता. त्याच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता. जाफरजीन प्लॉट येथे दुचाकी व ऑटोरिक्षाने आलेल्या पाच जणांनी प्रथम दुचाकी चालवत असलेल्या नानिका हसनच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. बेसावध असतानाच त्याच्या तोंडावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले. याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून कोतवाली पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानिका हसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यावेळी रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता.

नानिका हा शहरातील गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. गांजा तस्करी, जुगार तसेच विविध प्रकारचे ४० ते ४५ गुन्हे त्याच्यावर नोंदले आहेत. पोलिसांच्या चार पथकांनी शोधकार्य राबवून पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

या हत्येचे धागेदोरे काही वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या सल्लू हत्याप्रकरणाशी जुळले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.

हत्येच्या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान

गेल्या महिनाभरात हत्येच्या अनेक घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वीच एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. आरोपी जाकीरउद्दीनने पत्नी बीबी खातूनची निर्घृण हत्या केल्याचे पुराव्यावरून निदर्शनास आले होते. जाकीरउद्दीनविरुद्ध यापूर्वी हत्येचे दोन गुन्हे, विनयभंग, बलात्कार, घरफोडी व चोरी अशा १७ गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्याने पत्नीची नियोजनबद्ध हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत महिलेच्या मुलीने व बहिणींनी मृतदेहाची ओळख पटवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:11 am

Web Title: criminals killed in daylight in amravati zws 70
Next Stories
1 आयपीएस अधिकारी अक्षय शिंदेसह चौघांना ३ लाख दंडाची नोटीस
2 ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते, नारायण राणेंचा दावा
3 “बाळासाहेबांच्या नातवाने सोनियांच्या नावाची शपथ घेणं यापेक्षा मोठा अपमान काय?”
Just Now!
X