|| निखिल मेस्त्री

  कारखाने निरीक्षकांची कमतरता; औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

पालघर : जिल्ह्यात कारखाने निरीक्षकांची कमतरता असल्याने औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक सुरक्षेअभावी कामगारांवर मृत्यूची टांगती तलवार उभी आहे. जिल्ह्यात आठ कारखाने निरीक्षकांची पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात चार पदे भरली गेलेली आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील डहाणू, वाडा, वसई, तलासरी या तालुक्यांत लहान-मोठे असे हजारो विविध उत्पादन घेणारे कारखाने दिवसरात्र धडधडत आहेत. मुंबईपासून ते थेट गुजरातचे लाखो कामगार या ठिकाणी उपजीविकेसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र वसाहतीच्या सुरक्षेसाठी नेमलेले कारखाने निरीक्षक यांची संख्या कमी असल्याने कारखाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारखाने निरीक्षकांची संख्या कमी असल्याने कारखाना सुरक्षेच्या तपासणीमध्ये उणिवा राहत आहेत. त्यामुळे काही कारखान्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांची वानवा असल्याने त्याकडे औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्याातील विविध औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेसाठी उभारलेली ही शासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याने कंपनी सुरक्षा हा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवला जात आहे. कंपनीत कामावर ठेवताना जास्त पगार द्यायला लागू नये म्हणून बऱ्याच कंपन्या कुशल कामगारऐवजी अकुशल कामगारांना कामावर ठेवत आहेत. या अकुशल कर्मचाऱ्यांमार्फत कारखान्यातील यंत्रणा हाताळली जात आहे.

या बाबी तपासण्याची जबाबदारी कारखाने निरीक्षकांची आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षेच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजना तपासण्यात त्रुटी राहत असल्याने बऱ्याचदा कारखान्यात अपघात बळावले आहेत. त्यात कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मृत्यू झालेल्या कामगारांना अनेकदा कारखाना प्रशासनाकडून नुकसानभरपाई दिलेली नाही. औद्योगिक वसाहतीतील विविध उत्पादन क्षेत्रातील बहुतांश कारखाने उत्पादन फलक तसेच कारखान्याचा आराखडा दर्शनी भागात प्रसिद्ध केले गेलेले नाहीत. त्यांना या बाबींचे पालन करण्यासाठी औद्योगिक सुरक्षा संचालनालयामार्फत सक्तीचे करणे अपेक्षित आहे. मात्र तसे झालेले नाही.

एखादा अपघात घडल्यास कारखान्याच्या दर्शनी भागात कारखाना संरचनात्मक आराखडा असेल तर बचावकार्य करणे सुरक्षा यंत्रणांना सोयीचे जाते. मात्र तसे केल्याचे दिसून येत नाही. औद्योगिक सुरक्षा संचालनालयामार्फत या ठिकाणी कारखाना सुरक्षेकरिता नेमून दिलेले अधिकारी सुरक्षेबाबत किती गंभीर आहेत हा संशोधनाचा विषय आहे. आजही कामगार सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरच आहे.

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे कार्यालय औद्योगिक वसाहतीत असणे अपेक्षित असताना गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यालय वसई येथे कार्यरत आहे. हे कार्यालय औद्योगिक वसाहतीत असावे अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन वर्षांत झालेले अपघात

  •  ८ मार्च २०१८ : ई प्लॅन्टमध्ये असलेल्या नोवा फेम स्पेशालिटी कंपनीमध्ये भयानक स्फोट होऊन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी
  •  ८ सप्टेंबर २०१८ : यूपीएललि या कंपनीला ब्रोमीन या रसायनांच्या गळतीमुळे झालेल्या अपघातात चार कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
  •  १२ ऑक्टोबर २०१८ : टी झोनमधील लुपिन लि. कंपनीसमोर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे शेकडो चिमण्यांचा मृत्यू झाला.
  •  २० जानेवारी २०१९ : रामदेव केमिकल्स या कंपनीतील स्फोटात २ कामगारांचा मृत्यू झाला.
  •  २७ जानेवारी २०१९ : साळवी केमिकल्समध्ये पेटते सॉल्व्हंट अंगावर पडल्याने १ गंभीर व ६ कामगार जखमी झाले.
  •  मार्च, एप्रिल व मे महिन्यात अनुक्रमे मे के.सी. काटा, मंधना व डी. सी टेक्स या कंपन्यांमध्ये प्रत्येकी एक असा कामगाराचा मृत्यू झालेला आहे.
  •  ४ मे २०१९ : रोजी बजाज हेल्थकेअर, युनियन पार्क केमिकल, नोवासन केमिकल कारखान्यात तर १४ मे २०१९ रोजी आरती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये झालेल्या वायुगळतीत जवळपास ४५ कामगारांना बाधा झाली होती.
  •  १२ मे २०१९ : स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन कारखाना व्यवस्थापकासह तीन कामगारांचा बळी गेला. या कामगारांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनाही या विषारी वायूची बाधा झाली होती.
  •  २४ मे २०१९:  करीगो ऑर्गनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला.
  •  ३० ऑगस्ट २०१९: औषध निर्मिती करणाऱ्या एसएनए हेल्थकेअर या कारखान्यात वायुगळती होऊन सुपरवायझरचा मृत्यू झाला.
  •  एप्रिल २०२० : गॅलॅक्सी कंपनीत झालेल्या स्फोटात २ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला होता.

रिक्त पदे असल्याने विभागावर कामाचा ताण पडत आहे.ही रिक्त पदे शासनस्तरावरून भरणे अपेक्षित आहे. – ए. डी. खोत. सह संचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय,वसई))