प्रबोध देशपांडे

कापसावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला तर सोयाबीनसह मूग, उडीद, तूर, ज्वारी पिकांना पावसाचा फटका बसला आहे. काही भागांमध्ये ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असून, शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात अडकण्याची चिन्हे आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांपुढे विविध अडचणींचा मोठा डोंगर आहे. कधी नैसर्गिक, तर कधी कृत्रिम संकटांचा ससेमिरा शेतकऱ्यांमागे कायम असतो. त्यावर मात करत शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. या वर्षी करोना आपत्तीचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. त्यातून सावरत जगाच्या पोशिंद्याने आपल्या कर्तव्यपूर्तीवर भर दिला. करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव असतानाही जीव धोक्यात घालून बळीराजाने विविध पिकांची पेरणी केली. सदोष बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली. ढगाळ वातावरण व गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे विविध पिकांवर किडींचा प्रादुर्भाव व रोगराई आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगले उत्पादन होण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भात १० लाख हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र आहे. गत चार वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हंगामाच्या सुरुवातीला बोंडअळीला रोखण्यासाठी मान्सूनपूर्व पेरणी न करण्याच्या आवाहनासह जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरी गुलाबी बोंडअळीने नुकसान पातळी गाठली आहे. विविध भागांमध्ये गुलाबी बोंडअळी आढळून आली. सद्य:स्थितीत विदर्भातील कापूस उत्पादक जिल्हय़ात  कापसाचे पीक ९० ते १०० दिवसांचे असून बोंड अवस्थेत आहे. मान्सूनपूर्व किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर जुलै-ऑगस्ट महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर दिसून आला होता. गुलाबी बोंडअळीची ही सर्वसाधारणपणे दुसरी पिढी तयार होण्याची वेळ आहे. विदर्भात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तीन टक्के आढळून आला, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाकडून देण्यात आली. गुलाबी बोंडअळीचे पतंग निशाचर असल्यामुळे मध्यरात्री मिलन होऊन ते अंडी घालतात. या प्रक्रियेत गडद अंधाऱ्या रात्रीत जास्त वाढ होते व त्यानंतर तीन ते चार दिवसांत या अंडय़ातून अळय़ा बाहेर पडतात. अमावास्या कालावधीत वातावरणात होणारे बदल त्यासाठी सकारात्मक ठरतात. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील वातावरण पोषक आहे. पुढे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त वाढून मोठे नुकसान संभवते.

पश्चिम विदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये परतीचा दमदार पाऊस सुरू आहे. बुलढाणा जिल्हय़ात तर विविध भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी थांबले आहे. अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. संततधार पाऊस व ढगाळ वातावरणाचा सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी पिकांना चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अतिपावसामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला मोठय़ा प्रमाणात कोंब फुटले असून, किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. जास्त पावसामुळे मूग, उडीदचे हातचे पीक गेले, तूर, कापसाची बोंडे सडायला लागली आहेत. हायब्रीड ज्वारीचेही मोठे नुकसान झाले. पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. सर्वत्र ओल्या दुष्काळाचे सावट असून, पीक पाण्यात गेले. करोनासोबतच नैसर्गिक संकटाचा भडिमार सुरू असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

रब्बी हंगामासाठी पाऊस पोषक

गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या अतिपावसामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला आहे. मात्र, हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. पावसामुळे खरीप हंगामात नुकसान होत असल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठय़ा आशा राहतील. परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भात थमान घातले. परिणामी, शेतांमध्ये बहरलेल्या विविध पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

बीटीचा परिणाम आता नाहीसा झाला. बीटीचे बियाणे सदोष असून अळीची क्षमताही वाढल्याने दरवर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. सध्या ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. मूग, उडीद पीक हातचे गेले. सोयाबीनलाही फटका बसला. – प्रकाश पोहरे, अध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन.

अमरावती विभागामध्ये पाच ते सहा गावांमध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान आणि काही ठिकाणी सोयाबीनला कोंब आल्याच्या तक्रारी आहेत.  – सुभाष नागरे, कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.