भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत आणि एवढे दिवस जे आमच्याबरोबर होते, ते कोणाशी हातमिळवणी करतील, या विषयी शंका आहेत. कारण या सगळ्यांचे उद्दिष्ट केवळ सत्तेची खुर्ची आहे. त्यामुळे खोटे बोलताना ते कुठवरही जाऊ शकतात, अशी टीका करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीलाही चिमटा काढला. औरंगाबाद येथील आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही नाव न घेता त्यांनी टीका केली.
पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगल धरणाची उभारणी केली, तेव्हा काहीजण जन्मलेही नव्हते. इंदिरा गांधींनी हरित क्रांती केली तेव्हा काहींचे वय ५ वर्षे असेल! दुधाच्या क्षेत्रात क्रांती झाली, तेव्हा काहीजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गात जात होते. त्यांनीच राजीव गांधी यांच्या संगणकीकरणाला विरोध केला होता. ज्यांनी अधिक विरोध केला, त्यांचे राजकारणच आता त्याच क्रांतीवर अवलंबून असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. त्यांचा रोख नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.
काँग्रेसमधील अनेकांनी हा देश घडविण्यासाठी घाम गाळला. केवळ कष्ट केले नाही, तर प्रसंगी बलिदानही दिले. पंडित नेहरूंपासून ते डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत अनेकांनी देश घडविल्याचे सांगत ६० वर्षांत केलेल्या कामाचे कोणाकडूनही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. भारताला पुढे नेण्याचे काम या पक्षाने केले. पण केवळ चमको वृत्तीच्या नेत्यांना हे ऐतिहासिक काम लक्षात येणार नाही, असा टोलाही सोनियांनी लगावला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीही भाषणे झाली.
१९९५मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आले होते, तेव्हा खंडणीखोर व हप्तेखोरांची चलती होती. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. ती ताब्यात घेतल्यानंतर राज्याला विकासात पहिल्या क्रमांकावर आणल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मोदी रिमोटच्या आधारे देश चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली. सभेत राष्ट्रवादीचे कदीर मौलाना, सुरजितसिंग खुंगर, इसा कुरेशी, नगरसेवक अक्रम पटेल, जुबेर काझी, खलील खान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सोनियांकडून प्रश्नचिन्ह!
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेना-भाजपशीही हातमिळवणी करू शकतो, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे जाहीर सभेत केले. ‘कालपर्यंत आमच्याबरोबर होते, ते पुढे कोणाशी हातमिळवणी करतील,’ असे प्रश्नार्थक विचारत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शंका घेतली.
काँग्रेस व राष्ट्रवादीतील आघाडीस सोनिया गांधी यांची मान्यता आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीसाठी उत्सुक नव्हते, अशी टीका गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते करीत होते. विशेषत: शरद पवारांनीही चव्हाण हेच आघाडीतील अडथळा असल्याचे सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, राजू शेट्टी, महादेव जानकर, गोपीनाथ मुंडे आणि माझ्यामुळे तो उधळून लावला होता,’ असे म्हटले होते. राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
या पाश्र्वभूमीवर गुरुवारी आयोजित सभेत सोनिया गांधी यांनीही कालपर्यंत जे आमच्याबरोबर होते, ते सत्तेच्या खुर्चीसाठी काय करतील, अशी शंका उपस्थित केली.