प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी एका परिसंवादात बोलताना मार्क्‍सवादी क्रांतीचे समर्थन करताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितमुक्तीच्या प्रयोगांना अपयशी ठरवल्याने सध्या सोशल मीडियात मोठे वादळ उठले आहे. तेलतुंबडे यांनी मात्र आपल्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, असे सांगत या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे.
लखनौच्या अरविंद स्मृती न्यासतर्फे गेल्या १४ मार्चला चंदिगडला ‘जातिप्रश्न व मार्क्‍सवाद’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘‘डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीसाठी राबवलेल्या प्रयोगांना अपयश आल्याने आता देशातील दलितांना अन्य मार्गाचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी क्रांतीचा मार्ग योग्य असून, यात दलितांनी सहभागी झाल्यास त्यांना सहज मुक्ती मिळू शकते. दलितांच्या व्यापक सहभागाशिवाय या देशात क्रांती शक्य नसून डाव्यांनी आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे,’’ असे तेलतुंबडे या वेळी म्हणाले.
डॉ. आंबेडकरांचा मार्क्‍सवादावर सखोल अभ्यास नव्हता. डॉ. आंबेडकरांची आरक्षणाची नीतीसुद्धा चुकीची होती. त्यामुळे केवळ १० टक्के दलितांना फायदा मिळाला. त्यांनी या नीतीची मांडणी योग्य प्रकारे केली नाही, त्यामुळेच याचा फायदा समस्त दलितांना मिळू शकला नाही, अशी टीका करून ते म्हणाले, ‘‘भविष्यात मुक्ती हवी असेल तर दलित व क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या कम्युनिस्टांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दलितांवर अत्याचार झाले, तर डाव्यांनी आणि डाव्यांवर अत्याचार झाले, तर दलितांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे.’’
डाव्यांच्या क्रांतीचे समर्थन करण्याच्या भरात तेलतुंबडे यांनी दलित समाजात सर्वोच्च आदराचे स्थान असलेल्या डॉ. आंबेडकरांवर टीका केल्याने सुशिक्षितांचे वर्तुळ नाराज झाले असून, तशा प्रतिक्रिया यूटय़ुब व इतर संकेतस्थळांवर उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात तेलतुंबडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण तसे बोललो नाही, आपल्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, माझ्या भाषणातील वाक्यांची मोडतोड करून गैरसमज पसरतील, अशी सोयीची वाक्ये तयार करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. या परिसंवादात केलेल्या भाषणाची प्रत तातडीने पाठवण्याचे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्षात एक दिवस वाट बघूनही ‘लोकसत्ता’ला ही प्रत मिळालेली नाही. अरविंद स्मृती न्यासतर्फे जारी करण्यात आलेले या परिसंवादाचे प्रसिद्ध पत्रक ‘लोकसत्ता’जवळ उपलब्ध असून त्यात तेलतुंबडे यांनी आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा स्पष्ट उल्लेख आहे. या पत्रकाचा आधार घेत या परिसंवादाचे संचालन करणारे न्यासचे पदाधिकारी सत्यम वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तेलतुंबडे जे बोलले त्याच आधारावर पत्रक तयार करण्यात आले, असा दावा केला. यावरून उठलेल्या वादाबाबत विचारणा केली असता वर्मा यांनी कदाचित त्यांचा बोलण्याचा उद्देश तसा नसावा, असे सांगितले. या परिसंवादात माओवादी नेते नीनू चापागाईही हजर होते, असे पत्रकात नमूद आहे.