कृष्णा नदी पात्रात मगरीने पुन्हा एकदा एका मुलाला लक्ष्य करत नदीत ओढून नेल्याची घटना गुरूवारी घडली. सांगली जवळ मौजे डिग्रज या गावात ही घटना घडली. कृष्णा नदीपात्रात वावरणाऱ्या 12 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला करत त्याला ओढून नेले.
आकाश मारूती जाधव असे या मुलाचे नाव आहे. नदी काठी असलेल्या विट भट्टीवर काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास आकाश नदीकाठी वावरत असताना त्याला मगरीने ओढून नेले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गेल्या 4 तासांपासून वन विभागाचे कर्मचारी मुलाचा शोध घेत असून अद्याप त्यांना यश आले नाही.
काही महिन्यांपूर्वीच औदुंबरमधील नदी पात्रातून देखील एका मुलाला मागरीने ओढून नेले होते. शोधमोहिमेनंतर मुलाचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 5:58 pm