प्रसंगावधानामुळे बचाव, मगरीच्या दर्शनाने सांगलीतील कृष्णाकाठ पुन्हा हादरला
येथील कृष्णा नदीत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात शनिवारी सकाळी अचानक १८ फुटी मगर घुसली अन् सर्वाचीच घाबरगुंडी उडाली. या वेळी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या सुमारे ६० ते ७० जणांचा एकाचवेळी एकमेकांना सावध करण्यासाठी आणि नदीतून बाहेर पडण्यासाठी मोठा आरडाओरडा सुरू झाला. विसावा मंडळाचे कार्यकत्रे संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी नावेतून पाठलाग करुन या मगरीला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला.
कृष्णा नदीच्या काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. तरीही उन्हाळ्यामुळे आणि दहावी-बारावीची परीक्षा झाल्याने नदीवर पोहायला जाणाऱ्याची संख्या वाढली आहे. तसेच काही शाळकरी मुले पोहण्यास शिकायला येत असल्याने गर्दी वाढली आहे. शनिवारी सकाळी साडे आठ वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहायला गर्दी होती.
वसंतदादांच्या समाधीस्थळापासून १८ फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. पाण्यातून लपत ती पोहणाऱ्या लहान-मोठय़ांच्या घोळक्यात घुसली. मगर घुसल्याचे समजताच नदीपात्रात असलेल्यांबरोबरच तीरावर असलेल्यांचाही थरकाप उडाला. ‘अरे पळा मगर आली आहे’, असे काही जणांनी सांगताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. प्रत्येक जण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करु लागला. विशेषत शाळकरी मुले गोंधळून गेली. पाण्यातून बाहेर पडताना अनेक जण पायऱ्यांवर पाय घसरुन पडले.
हा गोंधळ सुरु होऊनही मगर गेली नव्हती. त्यामुळे सामाजिक कार्यकत्रे संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी नाव घेतली. नावेतून त्यांनी मगरीचा पाठलाग केला. बायपास पुलाच्यादिशेकडे मगर पळाली. तेथून ती गायब झाली. तिला वेळीच हुसकावल्याने पोहायला आलेली लहान-मोठी साठ-सत्तर मुले बचावली. अर्धातास हा थरार सुरु होता.
आतापर्यंत सात जणांचा बळी
हरिपूर, विष्णूघाट, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट येथेही सातत्याने मगर दिसली आहे. सांगली, हरिपूर, सांगलीवाडी, पद्माळे, ब्रह्मनाळ, भिलवडी, कसबे डिग्रज, तुंग या नदीकाठच्या मार्गावर गेल्या काही वर्षांत मगरींची संख्या व त्यांचा मुक्काम वाढला आहे. मगरींच्या हल्ल्यात आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही वन विभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना आखल्या जात नाहीत. नदीकाठी केवळ ‘मगरीपासून सावध रहावे’, असे फलक लावण्याशिवाय वन विभागाने काहीच केले नाही. मध्यंतरी या विभागाने केलेल्या सव्र्हेत ९६ पेक्षा जादा मगरी आढळून आल्या होत्या. आता ही संख्या आणखी वाढली असण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 2:07 am