सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरमधील पंचगंगा स्मशान घाट परिसराजवळील शेतवाडीमधून जाणाऱ्या ओढामध्ये पूर्ण वाढ झालेल्या अवस्थेतील मगर नागरिकांना दिसून आली. या मगरीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओंवरुन चांगलीच चर्चाही रंगली आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरात मगरीचा वावर पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या सांगण्यावरून ही मगर मादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये या मगरी बरोबरच इतर नर मादी व त्यांची पिलावळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागामधील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी दक्षता घेणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर यासाठी संबंधित खात्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन याची खातरजमा करावी. कोणताही धोका स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना किंवा या मगरींना देखील होता कामा नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मगर दिसल्यास किंवा त्यासंदर्भातील इतर तक्रारींसाठी शासकीय खात्यासोबत नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन बावडा रेस्क्यू फोर्स कसबा बावडा यांनी केलं आहे.