दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : महापुरामुळे नदीकाठचे नागरिक विस्थापित झाल्यानंतर मगरीने घराच्या कौलांवर बस्तान मांडल्याचे भीतीदायक चित्र मंगळवारी सकाळी डिग्रज येथे पाहण्यास मिळाले. मगरीबरोबरच सापांचाही मोठय़ा प्रमाणात आढळ पूरबाधित नागरी वस्तीमध्ये दिसून येऊ लागला आहे.

महापुराचे पाणी नागरी वस्तीतून ओसरू लागताच पूरग्रस्त आपल्या घराकडे परतत असताना मगरी, सापांचा सामना करावा लागत आहे.

नदीकाठाला मगरींचा मोठा वावर असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता महापुराच्या पाण्यासोबत मगरींचा वावर नागरी वस्तीमध्येही आढळला. याचबरोबर  घोणससारख्या अतिविषारी सापांचाही आढळ पूरबाधित भागामध्ये आढळत आहे. मगर, सापांमुळे पूरबाधित भागामध्ये घबराट निर्माण झाली असून असे प्राणी आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. काही सर्पमित्रही साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.

होतेय काय?  कृष्णाकाठी असलेल्या डिग्रजमध्ये एका घराच्या कौलांवर मगर आढळली. तसेच गावातील मुख्य चौकात असलेल्या हनुमान मंदिरासमोरील खुल्या जागेत असलेल्या महापुराच्या पाण्यातही मगरीचा मुक्त संचार दिसून आला. सांगलीजवळ असलेल्या हरिपूर येथेही मगरीची तीन पिले आढळून आली. या पिलांना पकडून पुन्हा नदीत सोडण्यात आले.