नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस मात्र परतण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवार व आणि शुक्रवार पालघर जिल्ह्य़ाला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. किनारपट्टीवरील गावांमध्ये गुरुवारी संध्याकाळपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांच्या नुकसानीत वाढ झाली आहे.

माहा चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर न धडकता पुन्हा अरबी समुद्रामध्ये उलटे फिरले असले तरी त्याचा परिणाम पालघर जिल्ह्यावर जाणवला. जिल्ह्यात गुरुवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. गुरुवारच्या पावसामुळे या नुकसानीत अधिक भर पडली.

या पावसामुळे खरिपातील सर्व पिकांचा तसेच बागायती क्षेत्रामध्ये लागवड केलेला भाजीपाला व फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस उघडलेला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली होती. मात्र कापणी केलेल्या पिकांवरच पाऊस पडल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेले पीक शेतात ठेवले होते. मात्र पावसात ते भिजल्याने मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सुकी मासळी पावसाने भिजल्याने त्याचा फटका मच्छीमारांना बसला. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दिवसभरात २० मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे.