जिल्ह्य़ातील बँकांनी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांकडे मानवी दृष्टिकोनातून पहावे,त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, तसेच शासनाने विविध योजनांतर्गत कर्जवाटपासाठी बँकांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती १०० टक्के कशी होईल याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी बुधवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर सुरेश परब, बॅक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर शिव सिंग, आर. बी. आय.चे ए. जी. एम. एस. भट्टाचार्य, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक तसेच लीड बँक अधिकारी टी. मधुसूदनआदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, बँका केवळ ठेवी स्वीकारण्यासाठीच नसून कर्ज वाटप करण्यासाठीसुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीस दिलेले कर्ज हे त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी न राहता त्याचे कळत-नकळत परिणाम इतरांवरही होतात, याचा विचार सर्व बँकर्सनी करावा. त्यांच्याकडे कर्ज मागणीसाठी आलेल्या ग्राहकांची हेळसांड करू नये, कर्ज देताना गरजूंची योग्य वेळ शोधून मदत करावी असेही त्या म्हणाल्या.
तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आढावा घेताना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जाचे वाटप तातडीने करावे व शासकीय योजना सर्व संबंधितांपर्यंत योग्य रीतीने पोहोचेल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
बठकीच्या प्रारंभी लीड बँक अधिकारी टी. मधुसूदन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून मागील बठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यास सर्वानी अनुमती दिली. तद्नंतर त्यांनी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने पंतप्रधान जन धन योजना, पंतप्रधानसुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन सुरक्षा डिपॉझिट योजना, जीवन सुरक्षा चेक योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, वित्तीय साक्षरताकेंद्र आढावा, तसेच स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आढावा आदींचा समावेश होता.
खरीप हंगामासाठी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप बँकांमार्फत केले जाते, त्यानुसार रायगड जिल्ह्य़ासाठी २०१५-१६ या वर्षांकरिता १३७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. त्यापकी १५ सप्टेंबर २०१५ अखेपर्यंत १३०.७८ कोटी रुपये म्हणजे ९५.४६ टक्के पीक कर्जवाटप केले असल्याची माहिती जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बुधवारी झालेल्या बठकीत देण्यात आली. त्या वेळी जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्जवाटप केलेल्या बँकांचे विशेष अभिनंदन केले आहे. या उद्दिष्टापकी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६४० कोटीचे उद्दिष्ट दिले होते त्यांनी १०५.१५ टक्के तसेच बँक ऑफ महाराष्ट्र ११२.६७ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक १६०.३० टक्के, आय.डी.बी.आय.बँक १०४.३६ टक्के, बँक ऑफ बडोदा १०४.८ टक्के तर बँक ऑफ इंडिया १००.६० टक्के असे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
या बठकीला जिल्ह्य़ातील सर्व बँकांचे प्रतिनिधी, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.