16 January 2019

News Flash

विदर्भात तोंडचा घास पाण्यात!

बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.

पश्चिम वऱ्हाडात रब्बी हंगाम उद्ध्वस्त; गहू, हरभरा, फळबागांना फटका

हाताशी आलेले पीक रविवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हिरावून नेल्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. थोडेथोडके नव्हे तर सुमारे दोन ते तीन लाख हेक्टरवरील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या गहू, हरभरा, तूर आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा,बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे. अकोला, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये पीक हानी अधिक आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ात गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पाऊस पिकांसाठी बाधित ठरल्याने त्याची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे. बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.

विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन महसूल विभाग आहेत. अमरावती विभागात ५ लाख ५० हजार हेक्टरपैकी ४.५ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. त्यात हरभरा आणि तुरीचे प्रमाण अधिक होते. गारपिटीमुळे एकरी २० ते २५ हजारांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. नागपूर विभागात साडेचार लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. सर्वच ठिकाणी गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागांना फटका बसला.

अकोल्यातील सर्व पिकांना फटका

गारपिटीमुळे पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्य़ातील रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. रब्बी हंगामात पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्प असल्याने मोठय़ा वर्गाला पाऊस व गारपिटीचे प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.  अकोला जिल्ह्य़ात  गहू, हरभरा, कांदा, लिंबू, संत्रा, भाजीपाला, फळ पिके आदींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. अकोल्यात जिल्ह्य़ात चार हजार ५०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात झाले. रब्बी हंगामात साधारणत: केवळ एक हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून या गारपिटीसंदर्भात शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती, अशी माहिती अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.एस.निकम यांनी दिली.

वाशीममध्ये ३५ गावांना फटका

वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील ३५ गावांना गारपिटीने झोडपले. आठ हजार ५०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मालेगाव आणि रिसोड या दोन तालुक्यांतील अनेक गावांमध्ये लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, लिंबू या फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील धारपिंप्री, कोळगाव बु., कोळगाव खु., चांडस, तरोडी, खरोडी, सावळद आदी गावांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस.गवसाने यांनी दिली.

बुलढाण्यात तीन हजार शेतकऱ्यांचाच विमा

बुलढाणा जिल्ह्य़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्य़ातील ११ तालुक्यांत गारपिटीसह वादळी पाऊस कोसळला. ३२ हजार हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  नांदुरा, संग्रामपूर व जळगाव जामोद, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, काळेगाव, माक्तासह खामगाव शहरानजीकच्या परिसरातील पिकांची हानी झाली. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, वारखेड, सगोडा, दानापूर, टुनकी, सायखेड या ठिकाणी नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील निमगाव, खामखेड, भुईशिंगा, नारखेड, अवधा आदी ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्य़ात सध्या पंचनामे करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लव्हाळे यांनी दिली.

सस्ती येथील बंड यांचे मोठे नुकसान

अकोला जिल्ह्य़ातील सस्ती येथील बंड परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाब बंड यांची दीड एकर शेती असून त्यांनी हरभरा, कांदा पीक पेरले होते. गोपाल बंड यांनी अडीच एकर पेरले होते. यांचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकरी गुलाब बंड यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये मोठा फटका

अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, मोर्शी, दर्यापूर, भातकुली, धारणी या तालुक्यांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे ८ ते १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेऱ्यापैकी १ लाख ३ हजार हेक्टरमध्ये हरड्टारा आणि ३८ हजार हेक्टरमध्ये गव्हाचा पेरा झाला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हरभऱ्याला बोनससह ४४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित झालेला असताना बाजारात सध्या किमान ३ हजार ५००, तर कमाल ३७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या पावसामुळे प्रत खराब झाल्याचे सांगून हरभऱ्याचे भाव आणखी कोसळण्याची   शक्यता आहे. पावसाने कांदा, टरबूज, टोमॅटो, मिरची आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पानमळेही संकटात सापडले आहेत.

यवतमाळ – ५० टक्के तूर पाण्यात

पुसद उमरखेड, महागाव, नेर, दारव्हा, कळंब, घाटंजी, बाभुळगाव आणि आर्णी तालुक्यात तूर गहू हरभरा संत्रा या पिकांना तडाखा दिला आहे. ५० टक्के पीक एक तर शेतात उभे आहे किंवा कापणी होऊन त्याचे शेतातच ढीग लावून ठेवण्यात आले आहे. गारपिटीचा या पिकांना तडाखा बसला. जिल्ह्य़ात एक लाख  हेक्टरवर तूर पेरणी झाली होती हे येथे उल्लेखनीय. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. १४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती व त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली होती.

गोंदियात रब्बीवर पाणी

गोंदिया जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत शेतांमध्ये गहू, हरभरा, मका, लाखोळी, बोर, पपई या पिकांना फटका बसला. आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. जिल्ह्य़ात फक्त ५३ हेक्टवरील रब्बी पिकांना फटका बसला असा कृषी विभागाचा अंदाज असला तरी सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर हा आकडा दोनशे हेक्टपर्यंत जाऊ शकतो. जिल्ह्य़ातील प्रमुख रोख पीक कमी पावसामुळे यापूर्वीच हातचे गेले. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रब्बी पीक घेतात. त्यामुळे फक्त ५३ हेक्टरला त्याचा फटका बसल्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी  बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले.

सरकारी मदतीसाठी प्रतीक्षाच..

जिल्ह्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी संत्री उत्पादकांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत वाट पहावी लागली. नैसर्गिक आपत्तीत सरकारी मदतीसाठी शेतकऱ्यांना वर्षांनुवष्रे प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यातून गहू, हरड्टारा, कांदा, करडई या पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळू शकेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईवषयी विमा कंपन्यांकडे दाद मागितली जाईल, मात्र ज्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली जाईल आणि पुन्हा मदतीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संत्रा, केळी बागांसाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील निकषांमधून किती प्रमाणात मदत मिळू शकेल, याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. संत्र्याच्या मृगबहाराची फळगळती आणि आंबिया बहाराचे नुकसान असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

हरभऱ्याला विमा संरक्षण नाही

पीकविमा काढण्याचे कितीही आवाहन सरकारने शेतक ऱ्यांना केले असले तरी पूर्वानुभव लक्षात घेऊन आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उल्लेखनीय म्हणजे विमा योजनेत हरभरा पिकाला संरक्षणच नाही, अकाली पावसाचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसला आहे.

First Published on February 13, 2018 3:50 am

Web Title: crops damaged due to unseasonal hailstorm in vidarbha