सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमितपणामुळे यावर्षी खरीप हंगाम धोक्याचा व चिंतेचा ठरला असताना आता सिंचनाअभावी रब्बी हंगामही धोक्यात येतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळणे अशक्य होत आहे. 

दुबार-तिबार पेरणीमुळे कमी उत्पादन झाले असून शासनाकडून मिळणारा हमीभाव अत्यंत कमी आहे. हा भाव धान उत्पादक शेतकऱ्यांना तारक ठरणार काय, हा प्रश्न कायम आहे. यावरून शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे खरच लक्ष देते का, हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आत्मसन्मान असे स्वप्न दाखवून मताचा जोगवा मागून झोळी भरून घेण्यात आली. बळीराज्य आणण्याचा आव आणणारे शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी धानाला मिळत असलेल्या अत्यल्प भावावर काहीही बोलायला तयार नाही. ही गोष्ट
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकताना दिसत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून पाटबंधारे विभागामार्फत प्रकल्पाच्या कालवे, उपकालव्यांतून पाटचऱ्या काढल्या जातात. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाटचऱ्या नेस्तनाबूत झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोयही उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जलसाठय़ात बऱ्यापकी पाणी असले तरी कालवे, पाटचऱ्या सदोष असल्याने शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नसल्याचे दिसते. अनेक पाटचऱ्या फुटल्या असून अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. याकडे लक्ष देत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच असलेल्या यातना यंदाच्या हंगामातही ‘जैसे थे’च आहेत.
बाजारातही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. दुबार-तिबार पेरणीनंतर तुरळक का होईना धान आलेय पण ढगाळ वातावरणाने आलेला तोंडचा घास हिरावला. यंदाचा खरीप हंगामही काळजीतच गेला.
सर्वच पिके यंदा उशिरा येत असल्याने रब्बी पिकांचेही नियोजन बिघडणार असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे रब्बी हंगामातूनही काही हाती लागेल की नाही, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत दिवाळीपूर्वी वा लगेच रब्बी हंगामातील हरबरा व अन्य पिकांची पेरणी होत होती. परिसरात पुरेसा पाऊन न आल्याने यंदाही रब्बी हंगामावर विपरित परिणाम होणार असल्याची चिन्हे आहेत. आधीच खरिपाने साथ सोडली. जमिनीत पाणी मुरले नाही. खरिपात पिकले नाही तर रब्बीवर भिस्त असतेय पण पाऊस व्यवस्थित न झाल्याने रब्बी हंगामावरही संकटच येणार असल्याची चिन्हे आहेत. सिंचनाची सोय न झाल्यास अनेक कोरडवाहू शेती असलेले शेतकरी रब्बी हंगामालाही मुकणार आहेत.