५७ कोटीच्या मदतीची आवश्यकता

नांदेड : उत्तरा नक्षत्राच्या पूर्वार्धात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे ८३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले. या मोठय़ा नुकसानीची संबंधितांना भरपाई देण्यासाठी सुमारे ५७ कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे प्रस्तावित केली आहे.

या महिन्यात १३ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्र सुरू  झाल्यानंतर या नक्षत्राच्या पहिल्या आठवडय़ातील पावसाने नांदेड, बिलोली, देगलूर, मुखेड आदी तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्यामुळे खरीप क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर बाधित झाल्याचे महसूल खात्याच्या यंत्रणेने केलेल्या पाहणीतून समोर आले.

हिमायतनगर, कंधार, लोहा, किनवट आणि माहूर हे पाच तालुके वगळता इतर ११ तालुक्यांतील ३८१ गावांमध्ये पिकांची हानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१३ ते १६ सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर होता. काही भागात वीज कोसळून जनावरे मृत्युमुखी पडली. अतिवृष्टीच्या थैमानात एक व्यक्?ती मरण पावली. ३१ मोठी आणि ९ लहान जनावरे दगावल्याचे दिसून आले.

पीक नुकसानीत बिलोली तालुका अव्वलस्थानी आहे. तेथे ४६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४१ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. देगलूर तालुक्यात ५८ हजार क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, तर मुखेड तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्राला पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला, असा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तीनही तालुक्यांना अतिवृष्टीचा जबर फटका बसल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी गेल्या आठवडय़ात भोकरला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. नांदेड तालुक्यात सुमारे साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके वाया गेली.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात काढलेले आणि काढणीला आलेले पीक उद्धवस्त झाले तर यंदा चांगल्या स्थितीतील पिकांना अतिवृष्टीने अक्षरश: आडवे केले.

अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्यानंतर शासन जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये मदत देते. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ८२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्यामुळे जिल्ह्याला मदत वाटपासाठी सुमारे ५७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.