मराठवाडय़ाची ओळख मागास अशी असली, तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती मात्र कोटींची उड्डाणे करीत असल्याचे चित्र आहे. दाखल शपथपत्रातून मराठवाडय़ात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रिंगणात उतरलेल्या रत्नाकर गुट्टे यांचे नाव आघाडीवर आहे. गुट्टे दाम्पत्याची संपत्ती १०१ कोटी ८ लाख ८७ हजार रुपयांची आहे. बीडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या डॉ. प्रीतम खाडे-मुंडे यांची संपत्ती ८८ कोटी आहे. औरंगाबादचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा, अशोक पाटील यांचाही यात वरचा क्रमांक लागतो.
‘अच्छा आदमी’ अशी जाहिरात करीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा दाम्पत्याची चल-अचल संपत्ती ५७ कोटी ३५ लाख रुपये आहे. दर्डाच्या नावे २९ कोटी ७७ लाख, तर त्यांची पत्नी आशू यांच्या नावे १२ कोटी ४ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. या दाम्पत्याच्या नावे १५ कोटी ५३ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर ३ गुन्हे दाखल असून, जबलपूर, नागपूर येथील न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. एक प्रकरण बंद केल्याचा उल्लेख शपथपत्रात आहे.
चल संपत्तीचा लेखाजोखा आयोगासमोर सादर करताना स्वत:कडे ९ लाख ४३ हजार रुपये रोकड, तर पत्नीकडे २ लाख ४१ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. बाँड व टपाल खाते, तसेच विमा कंपन्यात १४ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक दर्डा यांच्या नावे आहे, तर ७ कोटी ३२ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. २ लाख २५ हजार रुपयांची होंडा कारही त्यांच्या नावे आहे. १ कोटी ५७ लाख रुपयांचे जडजवाहिरे त्यांच्याकडे आहे, तर ३ कोटी २३ लाख रुपयांचे दागिने त्यांच्या पत्नीकडे आहेत. काही संस्था व व्यक्तींना कर्जही दिले आहे.
जिल्ह्य़ात शिवसेनेकडून अर्ज दाखल करणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची संपत्ती २ कोटी ९७ लाख २९ हजारांची आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची संपत्ती ३ कोटी ८६ लाख, तर वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी यांच्या हातावर केवळ २५ हजारांची व पत्नीकडे १२ हजारांची रोकड आहे. २ लाख २० हजारांची जंगम मालमत्ता तर १ कोटी ३८ लाख ३० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावेही १ कोटी ३ लाख ५० हजारांची स्थावर मालमत्ता शपथपत्रात नमूद आहे.
पैठणचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाघचौरे यांच्याकडे रोख ३० हजार रुपये, जंगम मालमत्ता ११ लाख ७९ हजार ७६२ रुपये, स्थावर मालमत्ता ४२ लाख ७४ हजार रुपयांची आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची जंगम मालमत्ता १ कोटी ४८ लाख २ हजार ५४९ रुपये असून पत्नीच्या नावे ९ लाख २२ हजार ३४७ रुपयांची संपत्ती आहे. फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे १३ हजार ६६९ रुपये, तर पत्नीकडे ३ लाख ७९ हजार रोख आहेत. जंगम मालमत्ता ५५ लाख ४० हजार रुपयांची आहे. स्थावर मालमत्ता ४ कोटी ४२ लाख १३ हजार रुपयांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावेही १ कोटी ७ लाख ४० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.