सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांत वणव्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच जीवसृष्टी व जंगली प्राण्यांना सैरावैरा पळावे लागले आहे. या अग्नीप्रलयानंतरही शासनाच्या कोणत्याही विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना आखणी केली नाही. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
वनखात्याच्या जंगलांना आग लावण्याचे पूर्वीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत, पण सध्या आंबा, काजू बागायतींना आग लावून हातातोंडाशी आलेले पीक वाया घालवण्यास काही विघ्नसंतोषी लोक कारणीभूत ठरत आहेत. आंबा-काजू बागायतींना आगी लावल्या जात असल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे धडे शिकविले जात आहेत, पण आपत्तीपूर्व व्यवस्थापन गरजेचे असताना आपत्ती येऊन नुकसान झाल्यानंतर चिंता व्यक्त करणारी टीम सध्या कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी अग्नीप्रलय होत आहे, पण शासन व राजकीय स्तरावर याबाबत कोणत्याही स्वरूपाची चिंता अगर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पावले टाकली गेली नाहीत.
फळबागायतीच्या विमा योजना आहेत, पण त्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांनी घेतला नाही. त्यामुळे या विमा योजनेतही शेतकऱ्यांच्या बागायतींना सामावून घेण्याची गरज आहे. जिल्ह्य़ात आंबा-काजू बागायतींना अग्नीप्रलयाने घेरले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजनांसाठी शासनाकडे शिफारस करण्याची आवश्यकता आहे.
बागायती व जंगलांना आगी लावणाऱ्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजनांची जाणीव करून देण्याची गरज आहे. वनांचे संरक्षण करणाऱ्या वनखात्यानेही अग्नीकांड थांबवून बेसुमार कत्तल थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.