आयपीएलच्या केवळ याच नव्हे तर आत्तापर्यंत झालेले सर्वच सत्र व बीसीसीआयच्या तत्कालीन अध्यक्षांची चौकशी करावी अशी मागणी करताना भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर नेम साधला.  
अहल्यादेवी होळकर यांच्या २८८ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी त्यांच्या जन्मगावी, चौंडी (तालुका जामखेड) येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या आधी मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयपीएलच्या मनोरंजनाने देशातील जनतेचा क्रिकेटवरील विश्वास उडाला तर आश्चर्य वाटायला नको. आयपीएलचे सामने शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच सुरू झाले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोडल्यानंतर शशांक मनोहर, श्रीनिवासन यांच्या नेमणुकाच शरद पवार यांनी केल्या आहेत. या सामन्यांच्या निमित्ताने देशात मोठय़ा प्रमाणावर सट्टा खेळला जातो हे यंदाच्या हंगामात उजेडात आले असले तरी वरील संदर्भ लक्षात घेता आयपीएलच्या याआधीच्या सर्वच हंगामांची चौकशी झाली पाहिजे असे मुंडे म्हणाले.