जिल्ह्यात करोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने पुसद, दिग्रस शहरांनंतर शनिवारपासून यवतमाळ, नेर, दारव्हा आणि पांढरकवडा शहरांमध्ये ३१ जुलैपर्यंत कडक टाळेबंदीसह संचारबंदी जाहीर केली आहे. टाळेबंदीपूर्वी आज शुक्रवारी दिवसभर बाजारपेठ उघडी ठेवण्यासाठी परवानगी दिल्याने नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. या गर्दीमुळे शहरात करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही गर्दी बघून खुद्द जिल्हाधिकारीही हैराण झाले.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ७०० वर गेली आहे. सध्या दीडशेपेक्षा अधिक सक्रिय करोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात करोना रूग्णांच्या संख्या वाढीचा वेग दुप्पट झला आहे. पुसद, दिग्रस, यवतमाळ, नेर, दारव्हा, पांढरकवडा ही शहरं आणि लगतचा ग्रामीण भाग करोना हॉटस्पॉट ठरले आहेत. त्या अनुषंगाने करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या चारही शहरात उद्या शनिवारपारसून टाळेबंदी जाहीर केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज शुक्रवारचा संपूर्ण दिवस खरेदीसाठी मोकळा ठेवला. मात्र आज दिवसभर नागरिक मोठ्या संख्यने घराबाहेर पडल्याने शहरातील संपूर्ण व्यवस्था कोलमडली. मुख्य बाजारपेठेत रस्ते जाम झाले होते. चौकाचौकात पोलीस तैनात असले तरी त्यांचेही गर्दीवर नियंत्रण राहिले नाही. सर्व नियम डावलून नागरिक फिरत होते. शारीरिक अंतराचाही फज्जा उडाला. किराणा दुकाने, मॉल, पेट्रालपंप, मद्य विक्री दुकाने, भाजीमंडी येथे पाय ठेवायलाही जागा नव्हती.

या गर्दीचे व्हिडीओ बघून जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शहरात इतकी गर्दी उसळली असताना पोलीस काय करत होते, असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी स्वत: काळजी घेतली नाही तर बिकट परिस्थिती होण्याची शक्यता ‘लोकसत्ता’शी बोलताना साधताना व्यक्त केली. टाळेबंदी असली तरी दूध, भाजीपाला, दवाखाने, औषधालये आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. प्रशासनाला सहकार्य करून करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टाळेबंदीसंदर्भात धोरणगोंधळावर टीका

करोना संसर्गावर टाळेबंदी हा पर्याय नसून टाळेबंदीमुळे समाजातील असंख्य घटक उद्ध्वस्त होत आहे, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी, असा सूर जिल्ह्यात उमटत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनास आपण काहीतरी काम करीत आहोत याची सुप्त जाणीव करून देणारा टाळेबंदीहा सोपा उपाय वाटत असल्याची जाहीर टीका येथील सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. घनश्याम दरणे यांनी केला. “नागरिक, काही अधिकारी यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे करोना संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. शहर कचराघर झाले आहे. त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले तर करोनाशिवाय अन्य साथीच्या आजारांपासून नागरिकांची सुटका होईल. टाळेबंदी हा धोरणगोंधळाचा भाग आहे आणि नागरिकांचा त्यात बळी जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेनेही विचार करावा,” असे आवाहन प्रा. दरणे यांनी केले आहे.