घरगुती गणपती विसर्जनानंतर सातारा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे खुले करण्यात आले आहेत. आकर्षक, कलात्मक गणेश मूर्ती हे वैशिष्टय़ असले, तरी या वेळी विविध रुपातील गणेशाची स्थापना करण्याचा मंडळांचा कल आहे. ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच पौराणिक, धार्मिक, सामाजिक देखाव्यांना गर्दी होत आहे.
बोगद्यातील राजा गणेश मंडळाने इंग्रजी अवतार या चित्रपटातील नायकाच्या रुपातील उडत्या सिंहावर आरुढ झालेला गणेश स्थापन केला आहे. हा गणपती आबालवृध्दांचे आकर्षण बनला आहे.श्री.छ.प्रतापसिंह गणेश मंडळाच्या गजाननाला भाविकांचा वाढती गर्दी असून या गणेशोत्सव मंडळाची कोणती ही आरास ,सजावट नसताना भाविकांच्या गणपती दर्शनाची पुर्तता या गणपतीच्या दर्शनाशिवाय होत नाही.अजिंक्य गणेश मंडळाने पारंपरिक पध्दतीने गणपतीची प्रतिष्ठापना तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केला आहे.सम्राट मंडळाचा गणपती तसेच प्रकाश गणेशोत्सव मंडळाचा गणपतींच्या पारंपरिक मूर्ती आणि सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.शनिवार पेठेतला मानाचा शंकर-पार्वती गणपती पूर्णपणे शाडूच्या मातीचा आहे.या मंडळाचे धार्मिक कार्यक्रम हे त्यांचे वैशिष्टय आहे.पंताचा गोट येथील बालगोपाल गणेशोत्सव मंडळाने भक्त प्रल्हादाचा हलता देखावा आकर्षण ठरत आहे.शिवाजी सर्कल येथील गणपती मंडळाला त्रेपन्न वष्रे पूर्ण झाल्या निमित्त कृष्णाचे अर्जुनास विश्वव्यापक दर्शन हा हलता देखावा केला आहे.हा देखावा पहाण्यास मोठी गर्दी होत आहे.फुटका तलावातील तराफ्यावरील मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.या शिवाय काही मंडळांनी वैद्यानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन देखावे सादर केले आहेत.
साता-यात साडेसहाशेच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यास परवानगी दिल्याने सलग तीन दिवस रस्ते गर्दीने गजबजतील.