सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटनात अचंबित करून टाकणाऱ्या धबधब्यावर गर्दी होते. आता त्यातील काही धबधब्यावर पर्यटकांना पायाभूत सुविधा देऊन त्यांच्याकडून नाममात्र पैसे घेऊन मौजमजा करण्याची संधी द्यायची, असा मध्यंतरी होणारा चर्चेचा सूर अद्यापि अंमलबजावणीपर्यंत आला नसल्याचे समजते.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यंतरी जिल्हाधिकारी, नियोजन मंडळ, वनखाते, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसाळी पर्यटनाचे नियोजन केले होते. पावसाळी धबधब्यावर पायाभूत सुविधा निर्माण करून द्यायच्या आणि या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांना नाममात्र फी आकारावी, असा निर्णय घेतला.
दोडामार्ग तालुक्यात मांगेली, सावंतवाडी तालुक्यात आंबोली, असनीये, कणकवलीत नापणे तसेच सहय़ाद्रीच्या पट्टय़ात असंख्य धबधबे आहेत. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग बनवून वाहने पार्किंग सुविधा आणि धबधब्यांना पायाभूत सुविधा देण्याचा निर्णय झाला. आंबोलीत आठ धबधबे आहेत तेथे पर्यटकांना नाममात्र फी आकारून मौजमजा करण्याची संधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मांगेली या दोडामार्ग तालुक्यातील धबधब्यावर गोवा, कर्नाटक व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. तेथे वाहनतळ आहे, पण या वाहनतळावर वाहन लावणाऱ्या वाहनधारकांकडून गावातील लोकच पार्किंग फी घेतात. त्याचे शासन स्तरावर नियोजन व्हायला पाहिजे. तशाच सुविधा आंबोली, गेळे व चौकुळ या ठिकाणी निर्माण व्हाव्यात अशी मागणी आहे.
पावसाळ्यात धबधब्यावर मौजमजा करण्यास येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा देऊन नाममात्र फी आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कोण करणार हा खरा प्रश्न आहे. ग्रामपंचायती असल्या तरी धबधबे विशेषत: वनखात्याच्या जमिनीत आहेत. त्यामुळे वनखाते धबधब्याचे नियोजन करणार, असे म्हटले जाते पण जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन अजूनही केले नसल्याने पावसाळी धबधबे पर्यटकांसाठी खुलेच राहणार आहेत.
या धबधब्यावर टाकण्यात येणारा कचरा, प्लास्टिक बाटल्या हेही स्वच्छता नियोजन करण्याची गरज आहे.